जिल्ह्यातील दोन रुग्णालये ‘जीवनदायी’तून बाहेर
By admin | Published: May 22, 2016 12:45 AM2016-05-22T00:45:42+5:302016-05-22T00:45:42+5:30
मनमानी कारभार भोवला : आरोग्य योजना समितीचा ‘निरामय’,‘रामकृष्ण’ यांना झटका
गणेश शिंदे ल्ल कोल्हापूर
राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’त समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन रुग्णालयांचे मुंबई येथील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या समितीने निलंबन केले. त्यामुळे या रुग्णालयाला येथून पुढे या योजनेतील कोणतीही प्रक्रिया राबविता येणार नाही.
घोटवडे (ता. राधानगरी) येथील ‘रामकृष्ण’ हॉस्पिटल व इचलकरंजी येथील ‘निरामय’ या रुग्णालयांचा निलंबनामध्ये समावेश आहे. या योजनेतील करार व अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी या रुग्णालयांवर समितीने ही कारवाई १७ मे २०१६ रोजी केली. कोल्हापूर जिल्ह्याबरोबर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची कारवाई केली आहे.
याबाबत जिल्हा समन्वयक डॉ. अशोक देठे यांनी दिलेली माहिती अशी की, राज्यातील तत्कालीन कॉँग्रेस आघाडी सरकारने राज्यात जुलै २०१२ मध्ये पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात कोल्हापूरसह उर्वरित जिल्ह्णात २१ नोव्हेंबर २०१३ रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. गरिबांना मोफत उपचार मिळावेत, हा या योजनेमागील उद्देश होता.
या योजनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हेर्ले, वडगाव, इचलकरंजी, गडहिंग्लजमध्ये दोन, महागाव एक असे तीन, घोटवडे तसेच येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांसह शहरातील सुमारे २० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. बहुतांश सर्वसामान्य लोक या योजनेचा लाभ घेतात. योजनेत ९७१ आजार आहेत. ३० वेगवेगळ्या तज्ज्ञसेवा आहेत. त्यात हृदयशस्त्रक्रिया, किडनी स्टोन, कर्करोग, आतड्याचे विकार, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, हाडांचे आजार, आदींचा समावेश आहे. दीड लाख रुपयांचे रुग्णास पॅकेज मिळते. यावर एम. डी. इंडिया संस्थेचे नियंत्रण आहे.
संबंधित समाविष्ट रुग्णालयाला ‘एनआयसी’कडून या योजनेत लाभार्थ्यांचा परतावा मिळतो; पण या रुग्णालयांकडून योग्य सेवा न मिळाल्यास संबंधित रुग्णाला त्याचे पैसे परत केले जातात. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांत १४५ प्रकरणांत सुमारे दहा लाख रुपयांचा परतावा संबंधित रुग्णास या रुग्णालयांकडून देण्यात आला आहे.
अशी होते कारवाई...
४या योजनेसाठी सरकारने व्हिजिलन्स स्क्वाड (भरारीपथक) नेमले आहे. हे पथक केव्हाही, कोणत्याही जिल्ह्णात जाऊन योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात अचानक जाते. या ठिकाणी रुग्णांशी चर्चा करते.
४प्रसंगी त्या रुग्णाच्या घरी जाऊन संबंधित रुग्णालयाने कशी सेवा दिली याविषयी माहिती घेते. त्यानंतर ते संबंधित जिल्हा समन्वयकाकडून त्याची सखोल माहिती मागविते.
४त्यानंतर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचीही समिती माहिती घेते. या समितीत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच एम. डी. इंडिया, नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (एन.आय.सी), मेडिकल असिस्टंट, पॅरामाउंट या संस्थांचे प्रमुख यांचा सहभाग असतो.
अशी करा तक्रार ...
४लाभधारकांना मुंबईतून ‘सेवेबाबत समाधानी आहे का?’ याबाबत विचारणा होते.
४१५५३८८ टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करता येते.
४एम. डी. इंडियाच्या भरारी पथकाकडेही तक्रार करता येते.
कारणे दाखवा नोटीस...
४या योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरामधील एका रुग्णालयाला ‘कारणे दाखवा’ (शो कॉज) नोटीस बजाविण्यात आली.
४या रुग्णालयाबाबत रुग्णांकडून विविध तक्रारी आल्या आहेत. त्याचबरोबर यापूर्वी शास्त्रीनगरमधील एका रुग्णालयाला अशाच प्रकारची नोटीस पाठविण्यात आली होती. या नोटिसीनंतर या रुग्णालयाने सेवेत सुधारणा केली.