महापालिका कर्मचारी करणार दोन तास स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:18 AM2019-03-16T11:18:33+5:302019-03-16T11:20:31+5:30
कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.
कोल्हापूर : शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या मोहिमेत लोकसहभाग वाढविताना महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही त्यात सक्रिय सहभाग राहिला पाहिजे, या हेतूने पंधरा दिवसांतून एकदा दोन तास सर्व कर्मचारी, अधिकारी त्यांच्या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. तशा सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्या.
महानगरपालिकेच्या कोणत्याही मोहिमेवर लोकांचा विश्वास बसायचा असेल आणि या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आधी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी त्यात भाग घेऊन मोहीम राबविली पाहिजे. म्हणूनच शहराच्या स्वच्छतेची सुरुवात आधी स्वत:पासून करायला हवी. याकरिता १५ दिवसांतून एकदा दैनंदिन कामातील फक्त दोन तास स्वत:चे कार्यालय व त्याच्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे.
मुख्य कार्यालय, विभागीय कार्यालय,अग्निशामक स्थानक, रुग्णालये, कार्यशाळा येथील कर्मचाऱ्यांनी ही स्वच्छता करायची आहे, असे आयुक्तांनी सांगितले. स्वच्छता कधी केली आणि पुढे कोणत्या दिवशी करायची आहे, याचे रेकॉर्ड संबंधित विभागाने ठेवायचे आहे, अशी सूचनाही त्यांनी केली.
दैनंदिन कचरा उठाव करताना कचऱ्यांचे वर्गीकरण अधिक चांगल्या पद्धतीने करावे, अधिकाºयांनी सतत दक्ष राहून काम करावे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात; तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, सोसायटी, गल्लोगल्लीत जाऊन नागरिकांमध्ये प्रबोधन करावे, अशा सूचनासुद्धा आयुक्त कलशेट्टी यांनी केल्या.
शहरात प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करावी. ज्या ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या तयार केल्या जातात, त्याच ठिकाणी प्रथम कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
‘स्वच्छता अॅप’चा प्रसार करावा
‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता अॅप’ला शहर परिसरातील १८ हजार नागरिक जोडले गेले आहेत; परंतु ही संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिक या अॅपशी जोडले जावेत यासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त तक्रारी या अॅपवर याव्यात याकडे लक्ष द्या, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सुचविले.