चिंचवाडमध्ये अडकले दोनशे साठ नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:12+5:302021-07-26T04:23:12+5:30
उदगाव: चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे. अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल २६० ...
उदगाव: चिंचवाड (ता.शिरोळ) येथे संपूर्ण गावाला कृष्णा नदीचा वेढा पडला आहे. अशा परिस्थितीत ही तलाठी, ग्रामसेवक याच्यासह तब्बल २६० नागरिरक अडकले आहेत. त्याचबरोबर ६० जनावरे ही अडकली आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आम्हाला बाहेर काढा, अशी आग्रही मागणी पुरात अडकलेल्या नागरिकातून होत आहे. चिंचवाडला गेल्या दोन पुरात संपूर्ण गावाला वेढा पडला होता. यावेळी ही संपूर्ण गावाला कृष्णा नदीच्या महापुराचा वेढा पडला आहे. २०१९ मध्ये तब्बल ३५० नागरिक अडकले होते. त्यावेळी मोठ्या प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचा अनुभव गाठीशी असतानाही चिंचवाड गावामध्ये सध्या २६० नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. चिंचवाडला जाण्यासाठी असणारे अर्जुनवाड, शिरोळ, उदगाव हे तिन्ही मार्ग बंद आहेत. येथील ग्रामविकास अधिकारी हणवते, तलाठी तमायचे, आरोग्य सेवक मुजावर हेही पुरातच अडकून राहिले आहेत.
अधिकारी वर्गाने नागरिकांना तत्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची गरज होती. गावातून बाहेर स्थलांतर केलेल्या नागरिकांची आरोग्य, जेवण, राहण्याची व्यवस्था करणे अगत्याचे असताना अधिकारीच अडकल्याने मोठी पंचाईत झाली. त्यामुळे आम्हाला प्रशासनाने तत्काळ बाहेर काढावे, अशी मागणी पुरात अडकलेल्या नागरिकांनी केली आहे.
फोटो ओळ- चिंचवाड ता. शिरोळ येथे संपूर्ण गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे.
छाया- अजित चौगुले, उदगाव