कोमलच्या श्वासासाठी जीव तोडून नाचणार दोनशे कलाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2017 11:23 PM2017-06-02T23:23:06+5:302017-06-02T23:23:06+5:30
कोमलच्या श्वासासाठी जीव तोडून नाचणार दोनशे कलाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताऱ्याची लेक कोमल गोडसे हिचा एक वर्षांपासून चेन्नईच्या रुग्णालयात जगण्यासाठी लढा सुरू आहे. या लढ्यात यशही येत आहे. प्रत्यारोपणासाठी हृदय आणि फुप्फुस उपलब्ध झाले परंतु, केवळ पैशांअभावी इलाज थांबलेत. कोमल हिच्या श्वासासाठी खारीचा वाटा उचलता यावा यासाठी साताऱ्यातील अठरा डान्स अॅकॅडमींनी एकत्र येत मंगळवारी चॅरिटी शो आयोजित केला आहे. यातून सुमारे अडीचशे कलाकार थिरकणार आहेत.
साताऱ्यातील कोमल पवार हिचा दीड वर्षांपूर्वी फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज विलास गोडसे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर अवघ्या एक वर्षांतच ती आजारी पडली. तिच्यावर सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर येथे उपचार करण्यात आले. मात्र, आजार दिवसेंदिवस गंभीर स्वरुप धारण करत असल्याने डॉक्टरांनी हृदय आणि फुफूस प्रत्यारोपन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
तिच्यावर सध्या चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या शस्त्रक्रियेसाठी केवळ दवाखान्याचा खर्च ३५ लाख तर एकूण खर्च ५४ लाखांच्या घरात जाणार आहे. हा खर्च कसा करायचा या चिंतेत कोमलचे नातेवाईक
आहेत.
कोमल पवार यांचा भाऊ कुलदिप पवार हा फुटबॉल खेळाडू असला तरी तो एक चांगला नृत्य कलाकार आहे. त्यातून त्याचे साताऱ्यातील नृत्यक्षेत्राशी चांगले संबंध आहेत. ‘कुलदिपची दिदी ही आपली दिदी आहे. कोमल दिदी मृत्यूशी झुंज देत असताना तिच्यासाठी काही तरी करायलाच हवे, हा अक्षय सावंत यांच्या डोक्यात घोळत होता. त्यांच्या भावना सहकारी मित्रांसमोर व्यक्त केली अन् त्यातून ‘मेघा
चॅरिटी शो २०१७’ ही संकल्पना पुढे आली.
साताऱ्यातील शाहू कला मंदिरमध्ये मंगळवार, दि. ६ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी साताऱ्यातील सर्वच्या सर्व डान्स अॅकॅडमी प्रथमच एकत्र येत आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक अॅकॅडमी स्वत:ची कला सादर करणार असून सरासरी दोनशे ते अडीचशे कलाकार यात सहभागी होत आहेत. तसेच नामवंत गुरुवर्य उपस्थित राहणार आहेत.
यासाठी नाममात्र शुल्क ठेवले असून यातून जमा होणारी संपूर्ण रक्कम कोमल यांच्या उपचारासाठी दिली जाणार आहे.
अवयव उपलब्ध... हवीय मदत
कोमल यांचे पती धीरज गोडसे यांच्या संपर्कात कुलदीप व त्याचे मित्र आहेत. चेन्नईतूनच कोमलसाठी फुप्फुस व हृदय उपलब्ध झाल्याची गोड बातमी चेन्नईहून मिळाली आहे. आता केवळ खर्चासाठी पैसा उपलब्ध झाला की तो बसविण्यात येणार आहे. कोमल यांच्या या लढाईत सातारकरांच्या मदतीची गरज आहे.
येथेही करू शकता मदत
कोमल यांच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी रवींद्रनाथ जीई असोसिएशनच्या एचडीएफसी बँकेच्या ०५, सबरी सलाई, मदीपखाम, चेन्नई शाखेच्या चालू खाते क्रमांक ०१११२०९०००००४४ या खात्यावर जमा करण्याचे आवाहन केले आहे.
या अॅकॅडमी सहभागी
एबीसीडी डान्स स्टुडिओ सातारा, अॅक्टीव्ह फ्लिपरस सातारा, मल्हार आॅरिअर्स, सातारा, पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी, सातारा, आकाश कला अॅकॅडमी, सातारा, ब्लॅक बॉईज् ग्रुप, सातारा, अपहोल्ड गु्रुप सातारा, फाईट क्लब सातारा, डान्स व्हिजन गु्रप सातारा, जायदेव भालेराव अॅकॅडमी, सातारा, नित्य साधना अॅकॅडमी, सातारा, बालगणेश कलामंच सातारा, के. जी. ग्रुप, सातारा, डी व्हारस गु्रुप सातारा, डी२डी गु्रप सातारा, टीम आय गु्रप कऱ्हाड हे संघ सहभागी होणार आहेत.