वाड्यावस्त्यामधील दोनशे विद्यार्थ्यांनी प्रथमच पाहिला 'न्यू पॅलेस'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 05:52 PM2022-04-26T17:52:50+5:302022-04-26T18:15:03+5:30
आपले गाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या या शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रथमच शाहूराजांचा राजवाडा न्यू पॅलेसही पाहिला.
कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील आठ वाड्यांमधील सुमारे आठ शाळांमधील दोनशे शाळकरी विद्यार्थ्यांनी येथील शाहू स्मारक भवन येथे ‘गॉड मस्ट बी क्रेझी-२’ या बालचित्रपटाचा आनंद घेतला. आपले गाव सोडून कधीही बाहेर न पडलेल्या या शाळकरी विद्यार्थ्यांनी प्रथमच शाहूराजांचा राजवाडा न्यू पॅलेसही पाहिला.
यावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना युवा दिग्दर्शक उमेश बगाडे म्हणाले, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगरी भागात आणि वाड्यावस्त्यांत असलेल्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना तेथे जाऊन विविध बालचित्रपट दाखवले. आज या वाड्यावस्त्यांतील शाळांमधील विद्यार्थी कोल्हापुरात आले, हे मला आनंदाचे वाटते. तुम्ही गोष्टी सांगायला, लिहायला शिका. त्याआधी पुस्तकं वाचा, माणसं वाचा, निसर्ग वाचा. माणूस म्हणून, कला म्हणून समृद्ध व्हा. सिनेमा हे मोठं माध्यम आहे. मात्र, आपण वेचून चित्रपट पहा, ऐका. माणूस बनविणारे पौष्टिक चित्रपट पहा, असे आवाहन बगाडे यांनी केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राधानगरी, शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यांतील वाड्यावस्तीतील सुमारे सात शाळांमध्ये ग्रंथालय सुरू करण्यासाठी चिल्लर पार्टीमार्फत तीन हजार रुपयांची पुस्तके आणि त्या शाळेतील मुलांना कपडे देण्यात आले. अध्यक्षस्थानी शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक दत्तात्रय नांगरे होते. यावेळी कोल्हापुरातील मल्हार जाधव या शालेय विद्यार्थ्याने लिहिलेल्या आणि त्यानेच चित्रे काढलेल्या ‘मल्हारच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केक कापून दहावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
यावेळी भुदरगड तालुक्यातील पंडिवरे विद्यामंदिरचे शिक्षक दिलीप मालंडकर, राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी विद्यामंदिरचे शिक्षक राजाराम रायकर, जाधववाडी विद्यामंंदिरचे शिक्षक रवींद्र बोडके, पिलावरवाडी विद्यामंदिरचे शिक्षक सुहास पाटील, शाहूवाडी तालुक्यातील येळवंडे विद्यामंदिरचे शिक्षक आनंदा काशीद, गौळवाडा विद्यामंदिरचे शिक्षक मारुती राठवड, सावर्डी भैरी धनगरवाडा विद्यामंदिरचे शिक्षक अमोल काळे, गोविंद पाटील, अवनी संस्थेचे शिक्षक शिंदे, कोल्हापुरातील सुधाकर जोशी झोपडपट्टीतील विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना ‘सिनेमा पोरांचा’ हे चिल्लर पार्टीचे पुस्तक भेट देण्यात आले.
बबन बामणे, ओंकार कांबळे, धनश्याम शिंदे, अर्शद महालकरी, अभिजीत कांबळे, अनिल काजवे, विजय शिंदे, सचिन पाटील, सुधाकर सावंत, महेश नेर्लीकर, मिलिंद कोपार्डेकर, अभय बकरे, मिलिंद नाईक, नसीम यादव, अनुजा बकरे, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, गुलाबराव देशमुख, सलीम महालकरी, भाऊ पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
पाणी बचतीची घेतली शपथ
शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी भैरीचा धनगरवाडा येथे शिकणाऱ्या मुलांना रोज दोन ते चार किलोमीटर चालत जाऊन घरात पाणी आणावे लागते. त्यांचे कष्ट सांगून मिलिंद यादव यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले. यानिमित्ताने पाणी बचतीचे महत्त्व सांगून पाणी बचतीची शपथ घेण्यात आली. बालचित्रपट दाखविण्यापूर्वी पाणी बचतीचा संदेश देणारा लघुपट दाखविण्यात आला.