Kolhapur: चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकली, अपघातात जवानासह दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 07:13 PM2023-12-19T19:13:03+5:302023-12-19T19:14:14+5:30
कसबा सांगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला. जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी ...
कसबा सांगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीला धडकून भारतीय सैन्य दलातील जवानासह दोघांचा मृत्यू झाला. जवान प्रकाश यशवंत सूर्यवंशी (वय २५), ओंकार विलास जठार (२२, दोघे रा. मांगुर, ता. निपाणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल- हातकणंगले येथे राञी उशीरा हा अपघात झाला.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, काल सोमवारी राञी प्रकाश व ओंकार हे दोघे ही कोल्हापूरला जावून येतो असे सांगून घरातून दुचाकीने (क्र.के.ए.२३ ईएफ.१९५७) निघाले होते. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमार्गे येत असताना त्यांच्या दुचाकीची भिंतीला धडक झाली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.
ओंकार हा खासगी कंपनीत मालवाहतूक करणा-या टेम्पोवर चालक म्हणून काम करीत होता. तर प्रकाश हा सैन्यात बेंगलोर येथे कार्यरत होता. प्रकाश हा पत्नीची डिलिव्हरी होणार म्हणून सुट्टी वर आला होता. त्याला सव्वा महिन्यांचा मुलगा आहे. तो २८ डिसेंबरला पुन्हा कामावर बेगंलोर येथे रूजू होणार होता.
प्रकाश हा दोन तीन वर्षापूर्वी सैन्यात रूजू झाला होता. त्या ठिकाणी चार वर्षे सेवा सेवा बजावल्यानंतर त्याची पॅरा कमांडो म्हणून जम्मू काश्मीर येथे नुकतीच नियुक्ती झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या पश्चात आई, एक मोठा भाऊ, पत्नी व सव्वा महिन्यांचा मुलगा तर ओंकार याच्या पश्चात आई, वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे. अपघातीमृत्यूने गावात सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. या बाबतची फिर्याद मयत प्रकाश याचा भाऊ संदीप यशवंत सुर्यवंशी याने गोकुळ शिरगाव पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर हे करीत आहेत.