'त्या' शाखा अभियंत्याच्या दोन वेतनवाढ कायमच्या बंद

By admin | Published: August 8, 2015 12:01 AM2015-08-08T00:01:11+5:302015-08-08T00:01:11+5:30

सीईओंची कारवाई : येळाणे पाणीयोजना; ८ लाखांच्या वसुलीची नोटीस

The 'two' increments of the branch engineer will be closed permanently | 'त्या' शाखा अभियंत्याच्या दोन वेतनवाढ कायमच्या बंद

'त्या' शाखा अभियंत्याच्या दोन वेतनवाढ कायमच्या बंद

Next

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील येळाणे येथील शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या कामामध्ये अनियमिततेचा ठपका ठेवून तत्कालीन शाखा अभियंता जी. डी. कुंभार यांना आठ लाख ७४ हजार ९०३ रुपयांच्या वसुलीचा दणका दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी ही कारवाई केली आहे. यामुळे पाणी योजनेतील ढपल्यात ‘हात मारलेल्या’ शाखा अभियंत्यांमध्ये खळबळ माजली आहे.सन २००५-०६ मध्ये येळाणे येथे शिवकालीन पाणी साठवण योजनेंतर्गत विहीर मंजूर झाली. या योजनेतील स्रोत बळकटीकरण आणि साठवण व्यवस्था करण्याचे काम येळाणे ग्रामपंचायतीने पोटमक्तेदार अर्जुन पाटील (रा. बांबवडे, ता. शाहूवाडी) यांना दिले होते. काम जिल्हा परिषदेच्या नियमांच्या चौकटीत राहून केले जाईल, नियमांच्या चौकटीत काम न झाल्यास झालेल्या नुकसानीस जबाबदार राहीन, कामांवर नियंत्रण उपअभियंता यांचे राहील, असा करारही झाला होता.
त्यानुसार कामावर नियंत्रण व मोजमाप पुस्तकात प्रत्यक्षात झालेल्या कामांची मापे नोंदविण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग क्रमांक दोनकडील (शाहूवाडी, पन्हाळा) शाखा अभियंता म्हणून कार्यरत असणारे कुंभार यांच्याकडे होती. मात्र, कुंभार यांनी कामावर नियंत्रण ठेवण्यात कुचराई केली. विहिरीच्या कामात कमी प्रमाणात सळी वापरली आहे. आर. सी. सी. जॅकेटिंग करून घेतले. याप्रमाणे शासनाचे ८ लाख ७४ हजार ९०३ रुपयांचे नुकसान केले आहे.
कुंभार यांनी आपल्या कामाची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडलेली नसल्यामुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ४ (३) मधील तरतुदींनुसार कुंभार यांच्या दोन पात्र वेतनवाढी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत.
नुकसानीची आठ लाख ७४ हजार ९०३ रुपयांस कुंभार यांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. नुकसानीची रक्कम दरमहा १५ हजार याप्रमाणे त्यांच्या वेतनातून ५८ हप्ते आणि उर्वरित चार हजार ९०४ चा ५९ व्या हप्त्यातून वसूल करण्यात येणार आहे. ही रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेदार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The 'two' increments of the branch engineer will be closed permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.