दोन अपक्षांचे अर्ज दाखल
By Admin | Published: September 23, 2014 10:59 PM2014-09-23T22:59:38+5:302014-09-23T23:02:43+5:30
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी मंगळवारी नगर शहर व श्रीगोंदा मतदारसंघातून प्रत्येकी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले़
अहमदनगर: विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी मंगळवारी नगर शहर व श्रीगोंदा मतदारसंघातून प्रत्येकी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाले़ आघाडी व महायुतीचा घोळ सुरू असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केले नाही़मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर संग्राम जगताप व मनसेचे स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्यासाठी अर्ज घेण्यात आले आहेत़ त्यामुळे शहरात आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत़
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़ तीन दिवसांपासून शहरासह ही प्रक्रिया सुरू आहे़ परंतु पहिल्या दोन दिवसांत कर्जत-जामखेड मतदारसंघातून अपक्ष एक अर्ज दाखल झाला़ आघाडी व महायुतीचा घोळ सुरूच असल्याने प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी अर्ज दाखल करणे टाळले आहे़ त्यात अर्ज दाखल करण्यास सध्या मुहूर्तही नाही़ त्यामुळे पितृ पंधरवाडा संपल्यानंतरच अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असे बोलले जात आहे़ असे असले तरी अपक्ष अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे़ सोमवारी कर्जत येथून पहिला अपक्ष अर्ज दाखल झाला़ नगर शहर मतदारसंघातून अपक्ष अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे़ सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे़ श्रीगोंदा मतदारसंघातून सचिन पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला़ उर्वरित दहा मतदारसंघातून एकही अर्ज दाखल झाला नसून, नगर शहर मतदारसंघातून ९ जणांनी १५ नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत़ त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस उशिरा का होईना, पण सुरुवात झाली आहे़ आघाडी व युतीचा निर्णय होऊन घटस्थापनेनंतर चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून अर्ज दाखल केले जातील़
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास शेवटचे चार दिवस राहिले आहेत़ गत तीन दिवसांत अवघे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ दाखल झालेले अर्ज अपक्षांचे आहेत़ नगर शहरासह श्रीगोंदा आणि कर्जत- जामखेडमधून हे अर्ज दाखल झाले आहेत़ उर्वरित ९ मतदारसंघात सध्या तरी शांतता आहे़ परंतु या मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे़ येत्या चार दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांचे अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)