कोल्हापूर विमानतळावर सुरक्षित उड्डाण, लँडिंगसाठी दोन उपकरणे; खास तंत्रज्ञांकडून यशस्वी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:09 PM2024-05-17T12:09:00+5:302024-05-17T12:09:15+5:30
याआधी एनडीबी म्हणजेच नॉन डिरेक्शनल बिकन ही यंत्रणा वापरली जात होती
कोल्हापूर : येथील विमानतळावर विमानाची सुरक्षित वाहतूक, उड्डाण आणि नाइट लँडिंगसाठी पूरक ठरणाऱ्या दोन अद्ययावत उपकरणांची गुरुवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या खास विमानाने तंत्रज्ञ गुरुवारी विमानतळावर आले होते.
धुक्याच्या किंवा अन्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये विमान उतरवण्यासाठी किंवा उड्डाणासाठी दिशादर्शक म्हणून याआधी एनडीबी म्हणजेच नॉन डिरेक्शनल बिकन ही यंत्रणा वापरली जात होती; परंतु दक्षिण कोरियामधील मोपियन्स कंपनीने हीच उद्दिष्टे समोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीतही अचूक दिशादर्शन करण्यासाठी म्हणून डीव्हीओआर आणि डीएमई अशी दोन उपकरणे विकसित केली आहेत.
या नव्या उपकरणांमुळे विमानांना कोल्हापूर विमानतळाकडे मार्गाक्रमण करण्यासाठी रेडिअल व डीएमपासूनचे अंतर समजणार आहे. डीव्हीओआर ही यंत्रणा एनडीबीपेक्षा अद्ययावत व विमानांची अचूक स्थिती प्राप्त करण्यासाठीची प्रणाली आहे.
गुरुवारी या उपकरणांचे सफल परीक्षण व प्रमाणीकरण करण्यात आले असून, लवकरच या उपकरणांसाठीची वरिष्ठ पातळीवरून मान्यता घेऊन वापर सुरू केला जाईल. कॅप्टन कटोच, कॅप्टन जोगळेकर, कॅप्टन पुनिया, एल. एन. प्रसाद, मोहित कांत शर्मा आणि हरदीप सिंग यांच्या पथकाने या दोन्ही उपकरणांची यशस्वी चाचणी केली.