दोघा इराणी चेन स्नॅचरना दोन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:45 PM2020-09-23T18:45:58+5:302020-09-23T18:47:29+5:30
चेन स्नॅचिंग आणि पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील अटक केलेल्या नागपूरच्या दोघांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शब्बीर सलीम अली (वय ३४), नादिर तालीब जैदी (४८, दोघेही रा. न्यू येरखेडा, कामठी, जि. नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली आहेत.
कोल्हापूर : चेन स्नॅचिंग आणि पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील अटक केलेल्या नागपूरच्या दोघांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शब्बीर सलीम अली (वय ३४), नादिर तालीब जैदी (४८, दोघेही रा. न्यू येरखेडा, कामठी, जि. नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली आहेत.
शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरण्याच्या घटना वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपासणी करताना मंगळवारी मार्केट यार्डजवळ दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची चेन स्नॅचिंग करणारी इराणी टोळी कोल्हापुरात येऊन सक्रिय झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी कामठी (जि. नागपूर) येथील शब्बीर अली, नादिर जैदी या दोघांना अटक केली.
त्यांच्याकडून रंकाळा स्टॅण्ड परिसरातील पोलीस असल्याचा बहाणा करून वृद्धेचे दागिने लुबाडल्याचा तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेन स्नॅचिंग असे दोन गुन्हे उघडकीस येऊन त्यातील सुमारे एक लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचे नसीम मेहंदी अली, युसूफ अमीर अली, मोहसीन गुलामराजा (गोलू) व हैदर युसूफ अली (सर्व रा. कामठी, नागपूर) हे अन्य साथीदारही पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.