Kolhapur: तिलारी धरणात बोट उलटून दोन जवानांचा मृत्यू, प्रशिक्षण दरम्यान घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:28 IST2024-09-09T17:27:38+5:302024-09-09T17:28:00+5:30
पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह काढण्यात लष्कराला यश

Kolhapur: तिलारी धरणात बोट उलटून दोन जवानांचा मृत्यू, प्रशिक्षण दरम्यान घडली दुर्घटना
चंदगड : तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये राजपुताना रायफलच्या जवानांचे प्रशिक्षण सुरू असताना बोट उलटून दोन जवान बुडाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी म्हाळुंगेजवळ घडली. विजयकुमार (वय २८, रा. धानीअशा राजस्थान ) व दिवाकर रॉय ( वय २८, रा. पश्चिम बंगाल ) अशी मृत जवानांची नावे आहेत.
शनिवारी राजपुताना रायफलचे जवान प्रशिक्षणासाठी म्हाळुंगे परिसरातील तिलारी धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आले होते. एकूण सहा जवान बोटीतून विहार करत होते. त्यादरम्यान अचानक बोट उलटली. यामधील सहाजण पाण्यात पडले. या बोटीमधील चार जवान पोहत काठावर आले. मात्र, दोन जवानांच्या पाठीवर मोठे ओझे होते आणि दोऱ्या पायात अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पाण्यात बुडालेले दोन्ही मृतदेह काढण्यात लष्कराला यश आले. रात्री उशिरापर्यंत घटना नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चिखल, वजन आणि दोरी अडकल्याने बुडाले
प्रशिक्षणादरम्यान जवानांच्या पाठीवर ओझे तसेच त्यांच्याकडे संरक्षणासाठी दोरी होती. बोट उलटल्यानंतर काही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून धरणाचा काठ गाठला, पण या दोघांना ओझे व दोरींमुळे जास्त हालचाल करता आली नाही. त्यात चिखलामुळे त्यांचे प्रयत्न असफल ठरल्याने त्यांच्या बुडून मृत्यूचा दुर्दैवी प्रसंग ओढवला.