Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 03:26 PM2024-06-08T15:26:35+5:302024-06-08T15:41:42+5:30
डंपरचालक पसार
देवाळे : चालकाचा भरधाव डंपरवरील ताबा सुटल्याने चौकात थांबलेल्या दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. मारूती रामचंद्र महाजन (वय ५७) व सुगंधा मारूती महाजन (५०) अशी मृतांची नावे आहेत. या भीषण अपघातात पती-पत्नी डंपरखाली चिरडले गेले. तर रस्त्याकडेला असणारा विद्युत खांब मोडला. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या डंपरने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या चौकात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला उडवले. त्यानंतर वेगाने पुढे जात विद्युत खांबास धडक देऊन पुढे उभ्या असलेल्या कारला धडक दिली. कारमधील पाचजण एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत डंपरच्या धडकेत विद्युत खांब मोडून अंगावर पडल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाले.
डंपरचालक पसार
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुख्य चौकात अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. या अपघातात मारूती महाजन व सुगंधा महाजन हे जागीच ठार झाले. तर चारचाकीमधील पाचजण रस्त्याकडेला गाडी लावून हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेल्याने पुढील अनर्थ टळला तर गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा बंद करून विखुरलेल्या तारा दूर केल्या.
शेतीकामासाठी आले होते गावी
मृत दाम्पत्य मूळचे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर जाधववाडी येथील असून गेल्या अनेक वर्षापासून ते इचलकरंजी येथे कामानिमित्त येथे राहत होते. गेल्या आठवड्यात शेतीकामानिमित्त ते गावी आले होते. काम आटोपून आज सकाळी ते इचलकरंजीस जात असताना ही दुर्घटना घडली.
मोठा अनर्थ टळला
अपघात झालेल्या ठिकणचा चौक नेहमी गजबजलेला असतो. वारणा कोडोलीकडे जाण्यासाठी सकाळी मोठी गर्दी असते. या ठिकाणी प्रवासी वाहतूक तसेच बस थांबा आहे. दररोजच्या तुलनेत आज कमी गर्दी कमी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.