केएमटी-मोटारसायकल अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:08 AM2018-09-05T01:08:05+5:302018-09-05T01:09:17+5:30
कागल : पुणे-बंगलोर महामार्गालगत जोड पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर नगारजींच्या घरासमोर के. एम. टी. बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. लक्ष्मण ऊर्फ लखन प्रकाश खोत
कागल : पुणे-बंगलोर महामार्गालगत जोड पुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावर नगारजींच्या घरासमोर के. एम. टी. बस आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. लक्ष्मण ऊर्फ लखन प्रकाश खोत (वय २७, रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले) आणि राकेश संजय बिरंजे (२३, रा. टाकवडे, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.
केएमटी बस (एमएच-०९-बीसी- २१६७) ही कागलहून कोल्हापूरला जात होती. सर्व्हिस रस्त्यावरून महामार्गाला जात असताना याच रस्त्याने मुरगूड नाक्याकडून मोटारसायकलवरून (एमएच०९-ईव्ही- २६३७) हे दोघे तरुण येत होते. नगारजींच्या घरासमोर आल्यानंतर मोटारसायकलची धडक बसचालकाच्या बाजूला बसली. मोटारसायकलीवरून खाली पडून हे दोघेही बसखाली घुसले गेले आणि पाठीमागील चाक दोघांच्याही डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
मोटारसायकल रस्त्यावर तशीच पडली होती. लखन खोतचे नातेवाईक येथील हणबर गल्लीत आहेत. त्यांच्याकडे तो आला होता, तर राकेश बिरंजे हा त्याचा मित्र होता. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी आणि ग्रामीण रुग्णालयात हणबर समाजातील लोकांनी गर्दी केली होती. अपघातानंतर के. एम. टी. चालक कृष्णात गणपती वरुटे (रा. द. वडगाव) हे कागल पोलीस ठाण्यात हजर झाले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृत लखन खोत विवाहित असून दोन आणि चार वर्षे वयाची दोन मुले आहेत, तर राकेश हा अविवाहित होता.