बांबरवाडीजवळ कोल्हापूरचे दोघे ठार
By admin | Published: June 18, 2014 12:57 AM2014-06-18T00:57:21+5:302014-06-18T00:58:33+5:30
भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळली
कोल्हापूर / पन्हाळा : पन्हाळा-कोल्हापूर मार्गावर बांबरवाडी (पिंपळे तर्फ सातवे) येथे चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव चारचाकी गाडी झाडावर आदळून दोन महाविद्यालयीन तरुण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. प्रसाद मुकुंद जाधव (वय २६, रा. कसबेकर पार्क, न्यू पॅलेसजवळ, कोल्हापूर) व अक्षय आप्पासाहेब पाटील (२२, रा. कसबा बावडा) हे ठार झाले. तर लखन बाळासाहेब गवळी (२७) व स्वप्निल धोंडिराम जाधव (२६, दोघेही रा. गवत मंडई, उत्तरेश्वर पेठ) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घडला.
याबाबत माहिती अशी की, पन्हाळगडावर पर्यटनासाठी हे चौघै टोयोटा (एमएच 0९ डीए १३२३) गाडीतून गेले होते. पन्हाळ्याहून सायंकाळी कोल्हापूरकडे परत येताना पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी) जवळ भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारील झाडावर आदळली. यात प्रसाद मुकुंद जाधव व अक्षय आप्पासाहेब पाटील हे दोघे जागीच ठार झाले, तर लखन गवळी व स्वप्निल जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासाठी बांबरवाडी ग्रामस्थांनी मदत केली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकीत गोयल तसेच पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी भेट दिली.