सांगली फाट्यानजीक मोटार अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:23 AM2021-02-14T04:23:57+5:302021-02-14T04:23:57+5:30

कोल्हापूर : भरधाव मोटार‌ रस्ता दुभाजकाला धडकून भीषण अपघातात कोल्हापुरातील दोघे युवक ठार झाले. करण रमेश पोवार (वय २७, ...

Two killed in Kolhapur road mishap | सांगली फाट्यानजीक मोटार अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

सांगली फाट्यानजीक मोटार अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

Next

कोल्हापूर : भरधाव मोटार‌ रस्ता दुभाजकाला धडकून भीषण अपघातात कोल्हापुरातील दोघे युवक ठार झाले. करण रमेश पोवार (वय २७, रा. ताराराणी कॉलनी, रेसकोर्स नाका), सूरज सदाशिव पाटील (२८, रा. ओम गणेश काॅलनी, रेसकोर्स नाका) अशी दोघांची नावे आहेत. सांगली फाटा येथील टोल नाक्यावर शुक्रवारी मध्यरात्री दुर्घटना घडली. दुर्घटनेत मोटारीचे मोठे नुकसान झाले.

याबाबत माहिती अशी की, सूरज पाटीलचा स्क्रॅप विक्री व्यवसाय असून, जवाहरनगर व कळंबा येथे स्क्रॅप डेपो आहेत. शुक्रवारी सायंकाळी तो मित्र करण पोवारला आपल्या मोटारीतून घेऊन मिरज येथे गेले होता. परतताना मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीक सांगली फाट्याजवळील टोल नाक्याच्या रस्ता दुभाजकला त्यांच्या भरधाव मोटारीची धडक बसली. दुर्घटनेत मोटारीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये करण पोवार जागीच ठार झाला. सूरजला गंभीर अवस्थेत खासगी रु्ग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना सूरजचाही मृत्यू झाला. दोघेही रेसकोर्स नाक्यावरील ताराराणी मित्र मंडळाचे कार्यकर्ते होते. अपघाताची माहिती मिळताच मध्यरात्रीच नातेवाईक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोवार कुटुंबियांवर दोन आघात

करणचे वडील रमेश पोवार हे महापालिकेत सुभाष स्टोअर्सच्या वर्कशॉपमध्ये पर्यवेक्षकपदावर नोकरीस होते. कोरोना कालावधित त्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी करणला सेवेत घेण्याबाबत हालचाली सुरू असतानाच करणच्याही अपघाती मृत्यूने पोवार कुटुंबियांवर पाठोपाठ आघात झाले. करण अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.

एकमेव आधार हरपला

मृत सूरज पाटील याचा वडिलोपार्जित स्क्रॅप व्यवसाय होता. तो त्याने वाढविला होता. त्याला आई-वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे घरचा आधारच कोसळला.

अर्धा तासात पोहोचतो...

रात्री उशिरापर्यंत दोघेही घरी न आल्याने अकराला करणचा भाऊ कुणालने फोन करून चौकशी केली, त्यावेळी जेवत आहोत, अर्धा तासात घरी पोहोचतो, असा निरोप दिला; पण तासाभरानेही ते घरी न पोहोचल्याने पुन्हा फोन केला, तो रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी घेतला. डॉक्टरांनीच, तुमच्या भावाचा अपघात झाल्याची माहिती दिल्याने पोवार कुटुंबियांना धक्का बसला.

Web Title: Two killed in Kolhapur road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.