वंटमुरी घाटात भीषण तिहेरी अपघात : दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:29 AM2021-07-14T04:29:57+5:302021-07-14T04:29:57+5:30

बेळगावपासून २० किलोमीटर अंतरावरील घाटातील मुंबई इंडियन ढाब्यानजीक काल रात्री बाराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. राजेंद्र आर. डोईफोडे ...

Two killed in Vantamuri ghat triple accident | वंटमुरी घाटात भीषण तिहेरी अपघात : दोन ठार

वंटमुरी घाटात भीषण तिहेरी अपघात : दोन ठार

Next

बेळगावपासून २० किलोमीटर अंतरावरील घाटातील मुंबई इंडियन ढाब्यानजीक काल रात्री बाराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. राजेंद्र आर. डोईफोडे (वय ३६, रा. घाटनांदूर, जि. बीड) आणि निरज (वय २२) अशी अपघात ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पिठाची पोती भरलेला कंटेनर शिगावहून उत्तर प्रदेशकडे निघाला होता. सोमवारी रात्री कंटेनर घाटात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर आपली डावी बाजू सोडून दुभाजक तोडत उजव्या बाजूला घुसला. त्याचवेळी समोरून कांदा भरलेला ट्रक निघाला होता.

या ट्रकवर कंटेनरचा पाठीमागील संपूर्ण सांगाडा पडला तर समोरील इंजिन ढाब्याजवळ थांबलेल्या टेम्पोवर जाऊन आदळले. ज्या कांदा वाहूट्रकवर सांगाडा पडला तो ट्रक पूर्णपणे चेपला गेला. त्याखाली चिरडून चालक राजेंद्र आर. डोईफोडे जागीच ठार झाला. शिवाय कंटेनरचालक निरज हा देखील गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

काकती पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हल्लुर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. रात्री सतत पाऊस पडत असल्यामुळे ट्रकमध्ये अडकलेला मृतदेह काढण्‍यासाठी कसरत करावी लागली. रस्त्यावरच तीनही वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आज, मंगळवारी पहाटे हा रस्ता वाहनांसाठी मोकळा करण्यात आला.

अट्टल सायकल चोरटा गजाआड : १३ सायकली जप्त ‌

बेळगाव - शहर उपनगरातून महागड्या सायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला टिळकवाडी पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीच्या १३ सायकली जप्त करण्यात आले आहेत.

सतीश बसाप्पा तेरणी (वय ३४, रा. तेरणी हत्तरगी, ता. हुक्केरी) असे गजाआड करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर उपनगरांतून सातत्याने महागड्या सायकलींची चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यातच टिळकवाडी आरपीडी क्रॉस येथील आश्रय एम्पायरमधून सायकल चोरीला गेल्याची फिर्याद उल्हास गिरीधर कुलकर्णी (रा. पाटील गल्ली) यांनी गेल्या रविवारी टिळकवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास हाती घेतला.

आज, मंगळवारी संशयित सतीश याला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याने महागड्या सायकली चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीच्या १३ सायकली जप्त केल्या आहेत. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली

…....

लाल पिवळ्याबाबत कवटगीमठ यांचे वक्तव्य

एकीकडे बेळगाव मनपासमोर फडकत असलेला लाल पिवळ्या ध्वजाबाबत कानडी संघटना मनपासमोर धिंगाणा घालत असताना दुसरीकडे विधान परिषदेचे मुख्य सचतेक आमदार महंतेश कवटगिमठ यांनी या ध्वजाबाबत वक्तव्य केले आहे.

काल सोमवारी कानडी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जुना ध्वज बदला आणि नवीन ध्वज घाला, अशी मागणी केली होती त्या शिवाय कस्तुरी नावाच्या एका महिलेने देखील याच मागणीसाठी मनपासमोर धिंगाणा घातला होता.

बेळगाव महापालिकेसमोर असणारा लाल पिवळा ध्वज बदलून त्या ठिकाणी नवीन ध्वज लावण्यासंदर्भात बोलताना त्यांनी याबाबत गृहमंत्री, कन्नड संस्कृती खात आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांसमवेत मी चर्चा करून नवा ध्वज लावण्याचा प्रयत्न करेन, असे कवटगीमठ यांनी म्हटले आहे.

याशिवाय बेळगावात हिवाळी अधिवेशन घेण्याची मागणी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

बेळगाव येथे आज मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना कवटगीमठ यांनी उपरोक्त माहिती दिली. सध्या होत असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य पूर परिस्थिती या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात हिवाळी अधिवेशन होणे गरजेचे असून आपण यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचेही महांतेश कवटगीमठ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Two killed in Vantamuri ghat triple accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.