कोल्हापुरात पावणेदोन किलो गांजा जप्त, एकास अटक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
By तानाजी पोवार | Published: September 1, 2022 05:26 PM2022-09-01T17:26:09+5:302022-09-01T17:26:37+5:30
गणेशोत्सवात सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर अंमली पदार्थाचा साठा करुन विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्याच्याविरोधात कारवाईचे आदेश
कोल्हापूर : बाबा जरगनगरात कमानीसमोर खुल्या मैदानात बेकायदेशीर गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. राहूल तानाजी कांबळे (वय ३० रा. पाचगाव, ता. करवीर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली. त्याच्या ताब्यातून सुमारे ३७,४०० रुपये किंमतीचा १ किलो ८७० ग्रॅम गांजा आणि मोपेड असा सुमारे ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेशोत्सवात सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर अंमली पदार्थाचा साठा करुन विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्याच्याविरोधात कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पथके तयार करुन शोध मोहिम घेतली.
पोलीस अंमलदार महेश गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने बाबा जरगनगरात कमानीसमोरील खुल्या मैदानात सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी गांजाची वाहतूक करताना राहूल तानाजी कांबळे याला पकडले. त्याच्या ताब्यातून ३७४०० रुपये किंमतीचा १ किलो ८७० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच ५०० ची रोकड व मोपेड असा सुमारे ५८ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, पोलीस महेश गवळी, खंडेराव कोळी, विजय गुरखे, रविंद्र कांबळे, सुरज चव्हाण, अनिल जाधव, महादेव कुराडे, पांडूरंग पाटील आदींनी केली.