कळंबा कारागृहात तयार होत आहेत नवरात्रौत्सवासाठी दोन लाख लाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:13 PM2019-09-24T14:13:53+5:302019-09-24T14:18:52+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.
येत्या रविवारी (दि. २९)पासून नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या निमित्त देवस्थान समिती व श्रीपूजकांची त्यांच्या पातळीवर तयारी सुरू आहे. दुसरीकडे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसाद पुरविणाऱ्या कळंबा कारागृहातही उत्सवासाठीची लगबग सुरू आहे. इतरवेळीपेक्षा उत्सवकाळात लाडूंची मागणी जास्त असते, गतवर्षी उत्सवकाळात पाऊस होता, तरीदेखील एक लाख ६० हजार लाडूंची विक्री झाली होती.
यंदा पावसाचा जोर ओसरला आहे, त्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा परस्थ भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या शक्यतेचा विचार करून कळंबा कारागृह प्रशासनाकडून दोन लाख लाडू बनविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.
देवस्थान समितीकडून रोज १0 ते १५ हजार लाडूंची आॅर्डर येते; त्यामुळे सध्या लाडूसाठीच्या कळ्या पाडण्याचे काम सुरू आहे; त्यासाठी ४० महिला कैदी व ६० पुरूष कैदी काम करत आहेत. सध्या सकाळी आठ ते दुपारी चार या एका शिफ्टमध्ये हे काम सुरू आहे. उत्सवकाळात मात्र दिवसरात्रीच्या शिफ्टमध्ये हे काम चालेल. महिला दिवसपाळीत, तर पुरूष रात्रपाळीसाठी काम करतील.