बेकायदेशीर मद्यवाहतूक प्रकरणी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:07+5:302020-12-31T04:26:07+5:30
कोल्हापूर : शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने पकडला. ...
कोल्हापूर : शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने पकडला. कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाईन्सच्या मालकासह टेम्पोचालकावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवला. वाईन्स मालक कुणाल कुमार सोनवणे (रा. आझाद चौक परिसर) व टेम्पोचालक अमर आनंदराव झांझगे (रा. कसबा सांगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने चोरट्या व बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवले आहे. बुधवारी त्या पथकाला हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज चौक मार्गावर पिवळ्या रंगाच्या हौदा टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना आढळला. त्यांनी टेम्पोचालकाची तपासणी केली. टेम्पोचालक अमर झंगझगे याने टेम्पोतील मद्याचा मालक संशयित कुणाल सोनवणे याच्या सांगण्यावरून शहरातील नऊ बार व हॉटेलमध्ये पोहोचविण्यास जात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी टेम्पोसह दोन लाख १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयितावर गुन्हा दाखल केला.
ओपन बार, बेकायदेशीर मद्यविक्री प्रकरणी कारवाई
गेल्या काही दिवसांत शहर परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या ३६९ जणांवर तसेच बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या ३३ जणांवर, बेकायदेशीर मद्याची वाहतूक प्रकरणी ४७ जणांवर, तर वाहन कायद्यांतर्गत २०४५ जणांवर कारवाई केल्याचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
फोटो नं. ३०१२२०२०-कोल-दारु कारवाई
ओळ : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षकाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो कोल्हापूर शहरात पकडला. सुमारे दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला.