ॲपवर माहिती भरताच बँक खात्यातील दोन लाख गायब; एटीएमसाठी गाळा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक
By उद्धव गोडसे | Published: October 12, 2023 08:26 PM2023-10-12T20:26:39+5:302023-10-12T20:26:49+5:30
संशयित शशी पटेल आणि राजीव शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : एटीएम मशिनसाठी गाळा भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी ओंकार शिवराज दिंडे (वय २९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांना दोन लाखांचा ऑनलाइन गंडा घातला. हा प्रकार जून ते ऑगस्ट २०२३ मध्ये घडला. याबाबत दिंडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयित शशी पटेल आणि राजीव शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिंडे यांचा गाळा एटीएमसाठी भाड्याने द्यायचा होता. त्यासाठी ते विविध बँकांसह फायनान्स कंपन्यांच्या वेबसाइटवरून माहिती घेत होते. मुथुट फायनान्स कंपनीच्या वेबसाइटवर त्यांना कोल्हापुरात गाळा भाड्याने पाहिजे असल्याची माहिती मिळाली. त्यावर ऑनलाइन अर्ज करून त्यांनी वेबसाइटवरील मोबाइल नंबरवर संपर्क साधला असता, शशी पटेल आणि राजीव शुक्ला या दोघांनी गाळ्यासाठी पाच लाख रुपये अनामत रक्कम आणि दरमहा २० ते २२ हजार रुपये भाडे मिळेल, असे सांगितले. त्यासाठी व्हॉट्सॲपला लिंक पाठवून एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. ॲपवर माहिती भरताना दिंडे यांना एक ओटीपी आला. तो ओटीपी ॲपवर भरताच त्यांच्या बँक खात्यातील एक लाख ९९ हजार ५५० रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यावर वर्ग झाली. त्यानंतर पटेल आणि शुक्ला यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.