सागरच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख
By admin | Published: March 14, 2017 01:10 AM2017-03-14T01:10:47+5:302017-03-14T01:10:47+5:30
मदतीचा ओघ सुरु : पत्नीला शासकीय नोकरीत घेण्यासाठीही हालचाली
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारताना रंगमंचावरच निधन झालेला अभिनेता सागर चौगुलेंच्या कुटुंबीयांसाठी रविवारी दोन लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. दुसरीकडे सागरची पत्नी वनिता यांच्या नोकरीसाठी प्रक्रिया सुरूकरण्यात आली आहे. पुण्यात राज्य नाट्य स्पर्धेत अग्निदिव्य नाटक सादर करीत असताना रंगमंचावरच सागरचा मृत्यू झाला होता. शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सागरची पत्नी वनिता यांना शासकीय नोकरीत रुजू करण्याचे तसेच त्यांच्या मुलीच्या नावे पाच लाखांच्या रकमेची ठेव ठेवण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी स्थानिक आमदारांनीही सागरच्या कुटुंबीयांची भेट घेतली व फौंडेशनच्यावतीने दोन लाख रुपयांचा निधी जाहीर केला. यावेळी हृदयस्पर्श व्यासपीठचे अग्निदिव्य नाटकाचे निर्माते पद्माकर कापसे, पद्मिनी कापसे, प्र्रिया मेंच, श्रीकांत जाधव, विनायक भोसले, जयदीप मोहिते, राज शेख, विजय पत्रावळे सुरेंद्र अहिर, नितीन शेळके शिवसेनेचे किशोर घाटगे, दीपक गौड, मंदार तपकिरे उपस्थित होते.
वनिता चौगुले यांचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचा बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली आहेत.
येथे जमा करा रक्कम
सागरच्या कुटुंबीयांना १२ दिवसांच्या आत भरीव निधी देण्याचा निर्धार कोल्हापुरातील रंगकर्मी व संस्थांनी केला आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रुपमधील सदस्यांच्यावतीने निधी संकलनाचे काम सुरूआहे. पुढील दोन-तीन दिवसांत सर्व संस्थांच्यावतीने जमा झालेली रक्कम सागरच्या पत्नीकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. ज्यांना आपल्यावतीने आर्थिक मदत करायची आहे त्यांनी वनिता सागर चौगुले, आयडीबीआय बँक, खाते नं ०६१५१०४००००९०८९०, आयएफएसडी कोड नं आयबीकेएल ००००६१५, राजारामपुरी शाखा, कोल्हापूर या बँक खात्यावर ही रक्कम जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय नोकरीबाबत अडचणएखाद्या व्यक्तीला शासकीय नोकरी मिळण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असते. शासनाकडून रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरावा लागतो, त्यांची लेखी परीक्षा होते, मुलाखत घेतली जाते.
त्यानंतर मेरीट लिस्टप्रमाणे रिक्त पदे भरली जातात. शासकीय नोकरीत असलेल्या एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्याच्या वारसांना अनुकंपा अंतर्गत नोकरीत रुजू करता येते. मात्र, हे अनुकंपा भरतीचे हजारो अर्ज शासन दरबारी पडून आहेत.
सागर चौगुले शासकीय नोकरीत नव्हते त्यामुळे त्यांची पत्नी वनिता यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी द्यायची असेल तर शासकीय नियमांनुसारच जावे लागेल, अन्यथा खासगी संस्थांमध्ये नोकरी देता येईल. या अडचणीवर आता चंद्रकांतदादा कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागेल.