‘दो हंसो का जोडा बिछड गया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:36 AM2018-09-18T00:36:00+5:302018-09-18T00:36:04+5:30
कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे जेवढे मल्लविद्येवर प्रेम होते, तितकेच प्रेम त्यांच्या पत्नी सुमित्रा अर्थात माई यांच्यावरही होते. या दोघांचे बंध ५१ वर्षांपूर्वीचे. मार्इंचे भाऊ किशोर हे हिंदकेसरींच्याकडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी जात होते त्यातूनच मार्इंची व वस्तादांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात अन् सरतेशेवटी लग्नात रूपांतर झाले. ५१ वर्षांच्या संसारानंतर रविवारी रात्री ज्या हृदयात त्यांनी मार्इंना बसविले होते, तेच बंद पडल्याने मार्इंचा आधार निघून गेला.
माई उच्चशिक्षित, तर हिंदकेसरी अक्षरशत्रू होते. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना या दोघांना सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील भेंडी गल्ली येथे मार्इंचे राहते घर होते. वडील मुंबई येथे रेल्वेत नोकरीस असल्याने त्याही तेथे खासगी कंपनीत नोकरी करीत होत्या. सुटी मिळेल त्याप्रमाणे त्या कोल्हापुरात येत असत. त्यात भाऊ किशोर हे हिंदकेसरी गणपतराव यांच्या मोतीबाग तालमीमध्ये कुस्तीचे धडे गिरवत होते. किशोरसोबत त्यांनी मार्इंना चार-पाचवेळा पाहिले.
तेव्हापासून ते मार्इंच्या प्रेमात पडले. भाऊ किशोरही वस्तादांबद्दल खूप काही चांगले सांगत. कालांतराने ओळख वाढली आणि त्यांच्या प्रेमाची चर्चा मोतीबाग तालमीतही पोहोचली. एकेदिवशी किशोरकडूनच मार्इंना लग्नाबाबत मागणी घातली; मात्र त्यास नकार देत किशोर यांनाच त्यांनी फटकारले. त्यात मार्इंची अट होती मुंबईतीलच नवरा करणार. दरम्यानच्या काळात हिंदकेसरींचा कुस्तीतील डंका देशभरात गाजू लागल्याने मार्इंची ही अट मागे पडली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला प्रथम विरोध होता.
हिंदकेसरींनी त्यांची समजूत काढत दोन्ही कुटुंबांना राजी केले. त्यात मार्इंच्या नातेवाइकांनीही सखोल चौकशी करीत, अखेर लग्नाला होकार दिला. ३ जून १९६७ साली केशवराव भोसले नाट्यगृहात मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह झाला अन् नलिनी ऊर्फ सुमित्रा राऊतांच्या आंदळकर झाल्या. ५१ वर्षांच्या संसारात अनेक वादळे आली, त्याचा सामना दोघांनीही मिळून केला. वस्तादांच्या अनेक अडचणींमध्ये त्या ढाल बनून राहिल्या.
मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी परिसरात ते भाड्याने राहू लागले. तेथून नव्वदीच्या काळात न्यू पॅलेस परिसरात त्यांनी स्वमालकीचे घर बांधले. यथावकाश ५१ वर्षांच्या संसारातून ही ‘दो हंसो की जोडी’ फुटली आणि रविवारी सायंकाळी त्यातील एक हंस अर्थात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर काळाच्या पडद्याआड गेले.