दोन मंगल कार्यालयांना प्रत्येकी दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:32+5:302021-04-07T04:26:32+5:30
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करुन लग्नकार्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक जमवणाऱ्या करवीर ...
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करुन लग्नकार्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक जमवणाऱ्या करवीर तालुक्यातील दोन मंगल कार्यालयांच्या मालकांवर मंगळवारी प्रत्येकी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली. आंबेवाडी येथील दत्त समर्थ मंगल कार्यालय व बालिंगा रोडवरील नागदेववाडी येथील वसंत हरी हॉल यांच्यावर ही कारवाई केली.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यालयात कार्यक्रमांसाठी ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित असतील तर त्या मंगल कार्यालयाच्या मालकांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. मंगळवारी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर व करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत उगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तसेच आंबेवाडी सरपंच सिकंदर मुजावर, आंबेवाडी व नागदेववाडी ग्रामपंचायत पथक यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली. आंबेवाडी येथे दत्त समर्थ मंगल कार्यालयामध्ये लग्नकार्यासाठी कार्यालयात ५० पेक्षा जादा लोक दिसून आले. त्यामुळे कार्यालयाचे मालक रामचंद्र बाबुराव कचरे (रा. वडणगे) यांच्यावर १० हजार रुपये दंडात्मक कारवाई केली.
तसेच फुलेवाडी नजीक बालिंगा रोडवर नागदेवाडी येथे वसंत हरी हॉलमध्येही लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जादा लोक उपस्थित असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे कार्यालयाचे मालक सुनील वसंतराव जाधव यांना १० हजार रुपये दंड केला.