मुलांचे लैंगिक व्हिडीओ अपलोड करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 04:05 PM2020-03-06T16:05:49+5:302020-03-06T16:08:19+5:30
लहान मुलांचे लैंगिक छायाचित्रण असणारे व्हिडीओ व पोर्नोग्राफिक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.
कोल्हापूर : लहान मुलांचे लैंगिक छायाचित्रण असणारे व्हिडीओ व पोर्नोग्राफिक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अमोल कुस्तास डिसोझा (वय ३५ रा. गजानन महाराज मंदिराजवळ, साधना कॉलनी, वडरगे रोड, गडहिंग्लज व विशाल दत्तात्रय अत्याळकर (वय ३१, रा. पहिली गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल व सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. डिसोझा याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
सोशल मीडियाचा वापर करून अश्लील व्हिडीओज,चाईल्ड पोर्नोग्राफी असलेले व्हिडीओ अपलोड व डाऊनलोड करणाºया वापरकर्त्यांची माहिती भारत सरकारच्या सूचनेनुसार फेसबुक च्या कॅलिफोर्निया कार्यालयाने उपलब्ध करून दिली होती. त्यांनी ही माहिती महाराष्ट्राच्या सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिली. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकरणांचा तपास कोल्हापूर सायबर पोलिसांकडे आला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे व सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. ५ एप्रिल २०१९ रोजी मध्यरात्री ११.४० वाजता कोल्हापुरातून स्त्री-पुरुष संबंधाचा एक अतिशय अश्लील व बीभत्स व्हिडीओ फेसबुक मेसेंजरद्वारे पाठविण्यात आल्याचे व तो अमोल डिसोझा याने अपलोड केल्याची माहिती स्पष्ट झाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक शोधून माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ व ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल केला.
त्यानंतर २९ एप्रिल २०१९ ला शेळकेवाडी (ता. करवीर) येथून लहान बालकांशी अनैसर्गिक संभोगाचे चित्रीकरण असलेला व्हिडीओ विशू डॉट शेळके डॉट ९ या फेसबुक मेसेंजरवरून अपलोड झाल्याचे व त्यासाठी मोबाईल क्रमांक ७०८३९५७२२० चा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. तपासात हा मोबाईल विशाल अत्याळकर वापरत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक मोरे यांच्यासह सुधीर पाटील, अनिल बरगे, विशाल पाटील यांनी केली.
अपलोड करणे हाच गुन्हा...
मोबाईलवर अनेकांना अश्लील व्हिडीओ डाऊनलोड करून तो पाठविण्याची फारच हौस असते. कुठल्या तरी कंपनीने हे काम आपल्याला पगारावर दिल्यासारखे लोक हा उद्योग करतात. असे करणाऱ्यांच्या हातात आता बेड्या पडू शकतात.
-
बारीक नजर
अश्लील पोर्नोग्राफी, चाईल्ड पोर्नोग्राफी असलेले व्हिडीओ तयार करून त्यांचे प्रसारण करण्याचे प्रमाण वाढल्याने गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस अॅप यांवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवण्यात येत आहे. असे कृत्य करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे.