सोशल मीडियावर ओळख, 'त्या' दोघींनी पुण्यात नोकरीची तयारी दर्शवली; अन् झाल्या बेपत्ता पण..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:02 PM2022-03-30T12:02:51+5:302022-03-30T12:03:22+5:30
सोशल मीडियावर एका व्यक्तीची ओळख झाली. त्याच्याकडे या दोघींनी पुण्यात नोकरीची तयारी दर्शवली. त्या तरुणाने नोकरी नाही; पण पुण्यात राहण्याची सोय करतो, असे सांगितल्याने त्या दोघी मैत्रिणींनी नियोजनबद्ध घरात न सांगता सोमवारी रात्रीच घरातून बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोल्हापूर : एक शाळकरी व दुसरी महाविद्यालयीन अशा दोन अल्पवयीन मुली घरात कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या. त्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्परतेने शोधमोहीम राबविली आणि पुण्याकडे आरामबसमधून निघालेल्या त्या दोघींना भुईंज (जि. सातारा) येथे ताब्यात घेतले. त्यांचे समुपदेशन करून सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात दिले. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरी परिसरातील दोन अल्पवयीन मुली सोमवारी रात्री अचानक घरातून बेपत्ता झाल्या. दोघीही मैत्रिणी असल्याने दोन्हीही घरच्या नातेवाइकांनी शोधाशोध करून राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पो.नि. ईश्वर ओमासे यांना सविस्तर माहिती दिली.
पोलिसांनीही तातडीने एक पथक तयार करून, दोन्हीही मुलींचे फोटो घेऊन शोध मोहीम सुरू केली. पथकाने मध्यवर्ती बस स्थानकासह खासगी ट्रॅव्हल्स यांच्याकडे चौकशी केली. फोटो दाखवत असताना, त्या दोन्हीही मुली पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित सतर्कता बाळगत पुणे मार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना संबंधित मुलींबाबत माहिती कळवली.
सुमारे दीड तासानंतर भुईंज पोलिसांना त्या दोन्हीही मुली आरामबसमध्ये मिळाल्या. त्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना कळवली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणले.
चौकशी करताना सोशल मीडियावर एका व्यक्तीची ओळख झाली. त्याच्याकडे या दोघींनी पुण्यात नोकरीची तयारी दर्शवली. त्या तरुणाने नोकरी नाही; पण पुण्यात राहण्याची सोय करतो, असे सांगितल्याने त्या दोघी मैत्रिणींनी नियोजनबद्ध घरात न सांगता सोमवारी रात्रीच घरातून बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या व्यक्तीने त्यांना राहण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले, त्यालाही चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.
पो. नि. ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबविलेल्या राजारामपुरी पोलिसांच्या शोधपथकात सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौजाळ, अंमलदार रंगराव चव्हाण, देवदास बल्लारी, पी. पी. जनवाडे आदींचा समावेश होता.