मेकर फसवणुकीतील आणखी दोघांना अटक; आजवर १८ जणांवर अटक, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तपासाला गती
By उद्धव गोडसे | Updated: April 13, 2024 20:38 IST2024-04-13T20:38:28+5:302024-04-13T20:38:58+5:30
विविध योजनांद्वारे कमी कालावधित जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून मेकर ॲग्रो इंडिया कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधित हजारो गुंतवणूकदारांना ५६ कोटी ५२ लाखांचा गंडा घातला.

मेकर फसवणुकीतील आणखी दोघांना अटक; आजवर १८ जणांवर अटक, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तपासाला गती
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मेकर ॲग्रो इंडिया कंपनीतील आणखी दोघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १३) अटक केली. कंपनीच्या सल्लागार समितीचा सदस्य सुरेश चापाजी जुन्नरे (वय ६५, रा. भांडूप पश्चिम, मुंबई) आणि मार्केटिंग कन्सलटंट श्रीधर हरिश्चंद्र खेडेकर (वय ५५, रा. पिंपळे गुरव, पुणे) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. आजवर या गुन्ह्यातील १८ आरोपींना अटक झाली.
विविध योजनांद्वारे कमी कालावधित जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून मेकर ॲग्रो इंडिया कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधित हजारो गुंतवणूकदारांना ५६ कोटी ५२ लाखांचा गंडा घातला. डिसेंबर २०१८ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास रखडला होता. मात्र, फिर्यादींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्यानंतर तपासासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याची सूचना न्यायाधीशांनी दिली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील स्वतंत्र तपास पथकाद्वारे संशयितांचा शोध सुरू असून, पथकाने मुंबई येथून सुरेश चापाजी, तर पुण्यातून श्रीधर खेडेकर या दोघांना अटक केली. चापाजी हा कंपनीच्या सल्लागार समितीचा सदस्य होता, तर खेडेकर हा मार्केटिंग सल्लागार म्हणून काम करीत होता. या दोघांचा गुन्ह्यातील सहभाग आणि कंपनीकडून घेतलेल्या लाभांची माहिती मिळविण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. न्यायालयात हजर केले असता, जुन्नरे याला सोमवारपर्यंत (दि. १५), तर खेडेकर याला गुरुवारपर्यंत (दि. १८) पोलिस कोठडी मिळाली.
आता उरले पाच संशयित
या गुन्ह्यातील एकूण २३ पैकी १८ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित पाच संशयितांच्या अटकेसाठी पथके पुणे आणि पालघर येथे रवाना झाली आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग झाल्यानंतर १५ संशयितांना अटक झाली, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.