एनडीआरएफची आणखी दोन पथके कोल्हापुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 02:23 PM2020-08-06T14:23:00+5:302020-08-06T14:23:24+5:30

कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील पूरपरिस्थिती बाबत शासनाला अवगत केले होते.

Two more NDRF squads arrive in Kolhapur | एनडीआरएफची आणखी दोन पथके कोल्हापुरात दाखल

एनडीआरएफची आणखी दोन पथके कोल्हापुरात दाखल

googlenewsNext

कोल्हापूर : प्रत्येकी २२ जवानांची दोन एनडीआरएफची पथके कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी दाखल झाली. एक पथक कोल्हापुरात तर दुसरे शिरोळ तालुक्यातील टाकळी येथे पोहचले.

महाराष्ट्रामध्ये दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पूरस्थिती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या आपत्ती विभागाच्या प्रधान सचिवांशी चर्चा केली व आवश्यक तेथे सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले, या चर्चेदरम्यान सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांना कोल्हापूर जिल्ह्यामधील संभाव्य पुरपरिस्थिती बद्दल विस्तृत माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणखी जादा एनडीआरएफ ची पथके पाठवली जावीत यासाठी आग्रह मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी धरला होता.

धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी, वारणा, व कोयना धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

 या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवला तर या धरणाखाली येणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे, सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेसह जवळपास सर्व नद्याखालील बंधारे पाण्याखाली गेले असून नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडत आहेत,  त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थितीचा धोका संभवतो असे बैठकीदरम्यान राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

 खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात करिता आणखी जादा एनडीआरएफची पथके  मिळावीत अशी मागणी काल केली होती.  बैठकीनंतर मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन पथके तातडीने कोल्हापूरकडे रवाना करण्यासाठीचे आदेश आपत्ती व्यवस्थापनाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय येवलकर यांना दिले होते. 
यावर संचालक येवलकर यांनी एनडीआरएफच्या पुणे येथील प्रमुखांना एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूरला रवाना करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देखील पूरपरिस्थिती बाबत शासनाला अवगत केले होते, त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन संचालक येवलकर यांनी वरील आदेश दिले.

Web Title: Two more NDRF squads arrive in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.