महापालिकेचे दोन अभियंते निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:32 AM2020-02-13T00:32:28+5:302020-02-13T00:32:34+5:30
कोल्हापूर : महापालिकेतील भ्रष्टाचाराची कीड साफ करण्याची मोहीम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली असून, बुधवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाम ...
कोल्हापूर : महापालिकेतील भ्रष्टाचाराची कीड साफ करण्याची मोहीम आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली असून, बुधवारी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे व नगररचना विभागाकडील कनिष्ठ अभियंता हेमंत जाधव यांना निलंबित केले, तर उपशहर अभियंता रमेश मस्कर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. शहर कचरामुक्त करता करता प्रशासनदेखील भ्रष्टाचारमुक्त करण्याच्या आयुक्तांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ६१ मधील कै. बाबूराव धारवाडे यांच्या बंगल्याच्या पश्चिम बाजूस रस्ता करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रस्त्याच्या कामावर अचानक भेट देऊन कामाचा दर्जा तपासला. रस्त्याचा बेस करत असताना त्यामध्ये डांबराचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजे नगण्य असल्याचे आढळून आले, तसेच रस्त्यावर अंथरलेली खडी हाताने निघत असल्याचे दिसून आले. कलशेट्टी यांनी शहर उपअभियंता रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता बाबूराव दबडे यांना रस्त्यावर झालेल्या कामाच्या दर्जाचा पंचनामा करण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या लेखी अहवालात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नमूद केले.
रस्त्याच्या कामावर देखरेख व नियंत्रण करण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे यांची होती. त्यांच्या या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले, तसेच महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांत रोष निर्माण झाला असून, नैतिक जबाबदारी म्हणून कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे यांना आयुक्तांनी तत्काळ निलंबित केले तसेच विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी अधिकारी म्हणून प्रभारी शहर उपअभियंता रावसाहेब चव्हाण व आनंदराव सूर्यवंशी यांची नेमणूक केली.
चुकीच्या रेखांकनामुळे जाधव निलंबित
‘ई’ वॉर्डातील रि.स. नं. १५६/१ उजळाईवाडी या मिळकतीमधील क्षेत्र विकास योजनेमध्ये बाधित होत असताना तिचे चुकीचे रेखांकन व टी. डी. आर. मंजूर केला असून, चुकीचा रहिवास विभाग व रस्त्याची आखणी दर्शविण्यात आली. याबाबत विधानमंडळ अंदाज समितीकडे तक्रार झाली होती. मिळकतीमधील अंतिम रेखांकन व टी.डी.आर. मंजुरीसाठी जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून विधानमंडळ अंदाज समितीने आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी याप्रकरणी कनिष्ठ अभियंता हेमंत जाधव यांना जबाबदार धरून निलंबित केले. तसेच त्यांचीही विभागीय चौकशीचे आदेश दिले. चौकशी अधिकारी म्हणून उपशहर अभियंता हर्षजित घाटगे व किरण गौतम यांची नियुक्ती केली आहे. निलंबन काळात नागरगोजे व जाधव यांनी दररोज शहर अभियंता कार्यालयात हजेरी द्यायची आहे.
घरफाळा घोटाळ्याची चौकशी अद्याप संथगतीनेच
कोल्हापूर : महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळ्याची चौकशी समिती नियुक्त करून एक महिना होऊन गेला; मात्र अद्यापही या समितीकडून चौकशीची गती संथ असल्याने ती पूर्ण होणार कधी आणि घोटाळेबाजांवर कारवाई होणार कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना चौकशी कधी पूर्ण करणार आहात, अशी विचारणा केली. येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेत घरफाळा विभागात गेल्या अनेक दिवसांपासून काही अधिकारी व कर्मचारी बेमालूमपणे घोटाळा करीत असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने त्यांनी काही प्रकरणांची खात्री करून घेतली तेव्हा तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी उपायुक्त धनंजय आंधळे, प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक यांची चौकशी समिती नियुक्त केली; परंतु चौकशी समितीने या कामात अद्याप म्हणावे तितके लक्ष घातलेले नाही.
चौकशी समितीला आवश्यक असणारी कागदपत्रे घरफाळा विभागाने यापूर्वीच दिली आहेत. या विभागाचे करसंग्राहक व निर्धारक संजय भोसले यांनी बुधवारीच एकूण २७ प्रकरणांची माहिती असलेली कागदपत्रे पुराव्यासह चौकशी समितीकडे सादर केली. चौकशी समितीचे सदस्य संजय सरनाईक यांनी आपल्याकडे अहवाल प्राप्त झाला असून, त्याची छाननी करण्याकरिता किमान आठ दिवस लागतील, असे सांगितले.
घरफाळा विभागातील घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांना निलंबित करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी शिवसेना तसेच कॉमन मॅन संघटनेचा आयुक्त कलशेट्टी यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे आयुक्तांनीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल द्या, असे समितीला सांगितले आहे.