‘दौलत’साठी ‘न्यूट्रीअन्स’चे दोन प्रस्ताव
By Admin | Published: April 26, 2016 12:17 AM2016-04-26T00:17:45+5:302016-04-26T00:39:07+5:30
६० वर्षांचा प्रस्ताव : ४० वर्षांसाठी पार्र्टिकल बोर्डच नको, शुक्रवारच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यासाठी न्यूट्रीअन्स अॅग्रो अँड फूड प्रा. लि. गोकाक यांनी निविदाद्वारे जिल्हा बॅँकेला ४० व ६० वर्षांचे दोन प्रस्ताव दिले आहेत. मार्च २०१७ अखेर जिल्हा बॅँकेचे २३ कोटी देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यांने देण्याचा प्रस्ताव असून, यावर शुक्रवारी (दि. २९) बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.
‘दौलत’च्या ६७ कोटी थकीत कर्जासाठी बॅँकेने नवव्यांदा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. यामध्ये केवळ ‘न्यूट्रीअन्स’ने एक कोटी बयाणा रकमेसह सोमवारी निविदा दाखल केली. दुपारी चार वाजता बॅँकेने निविदा उघडली, यामध्ये ‘न्यूट्रीअन्स’ने ४० व ६० वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेण्यास तयार असल्याचे प्रस्ताव दिले.
६० वर्षे करारात ‘एनसीडीसी’ व ‘एसडीएफ’ या दोन वित्तीय संस्थांचे पैशाबाबत बँकेने पुढाकार घेऊन हप्ते ठरवून द्यावेत. ४० वर्षे करारात ‘एनसीडीसी’चे कर्ज असलेला पार्टिकल बोर्ड सोडून उर्वरित प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी कंपनीने दाखविली आहे. जिल्हा बॅँकेच्या ६७ कोटींपैकी २३ कोटी मार्च २०१७ अखेर देण्याची तयारी दर्शविली आहे.
शासकीय नियमाप्रमाणे कारखान्याचे भाडे व बॅँकेचे उर्वरित कर्ज देऊ, असेही या प्रस्तावात कंपनीने म्हटले आहे. याबाबत जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)
बँकेची लपवाछपवी!
‘दौलत’ची निविदा प्रसिद्ध झाल्यापासून बॅँकेने कमालीची गुप्तता पाळली. किती निविदांची विक्री झाली, याबाबत प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली. निविदा उघडल्यानंतरही बँकेच्या उपाध्यक्षांनी सांगूनही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. अध्यक्ष तुम्हाला माहिती देतील, असे सांगितले, बॅँकेच्या या लपवाछपवीमागे नेमके गौडबंगाल काय ? याची चर्चा सुरू आहे.