लाचप्रकरणी शिरोळ पंचायत समितीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:57 PM2018-08-28T12:57:50+5:302018-08-28T13:03:20+5:30
शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (वय ५०, सध्या रा. पुणे) या दोघांवर सोमवारी शाहूपुरी पोलिसांत लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.
कोल्हापूर : शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (वय ५०, सध्या रा. पुणे) या दोघांवर शाहूपुरी पोलिसांत लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. पाणी योजनेच्या पूर्ण केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिल करून देण्यासाठी दोन लाख व बिलावर सही करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
अशोक कांबळे (एसीबी आरोपी)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित तुकाराम मंगल यांना अटक केली. तर कांबळे याला पुण्यातून अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांबळे याच्याकडे त्यावेळी शिरोळ पंचायत समितीतील कामाचा अतिरिक्त कार्यभार होता. सध्या तो पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग क्रमांक चार येथे याच पदावर आहे.
पोलिसांनी सांगितले की, टाकवडे (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजनेचे तीन कोटी ८० लाखांचा ठेका तक्रारदार यांच्या मित्राने आपल्या नावे २०१४ ला घेतला होता. त्यांना योजनेची वर्कआॅर्डर चार मार्च २०१४ ला मिळाली. तक्रारदार हे सुद्धा बांधकाम व्यावसायिक आहेत. मित्राला हे काम करण्यात अडचण आल्याने तक्रारदारांनी करारपत्रांद्वारे हे काम सुरू केले. तक्रारदार यांना वेळोवेळी तीन कोटी ५५ लाख रुपयांची सात बिले मिळाली. हे काम २२ मार्च २०१८ ला पूर्ण केले.
उर्वरित कामाचे २५ लाखांचे बिल मिळण्यासाठी शाखा अभियंता मंगल याची त्यांनी २४ मे २०१८ ला मूल्यांकन व एम. बी. शीट तयार करून देण्यासाठी भेट घेतली. त्यांनी या कामासाठी दोन लाख रुपये, तसेच कांबळे यांनी सही करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने २६ मे २०१८ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
या लाचेपैकी तुकाराम मंगल यांनी एक लाख रुपये व उपअभियंता कांबळे यांना ५० हजार रुपये द्यावेत व बिल मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावी, अशी मागणी केल्याचे पंचासमक्ष पडताळणी केली असता निष्पन्न झाले. कांबळे यानेही लाच मागितल्याचे २ जून २०१८ला पंचासमक्ष पडताळणी केल्यावर स्पष्ट झाले होते.
कुणकुण लागल्याने पुढे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कांबळे याने २२ जून २०१८ ला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा १६ जुलै २०१८ ला शिरोळ पंचायत समिती कार्यालयात त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारली नाही. तथापि, तपासात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारतर्फे पोलीस फिर्यादी झाले.
त्या आधारे संशयित तुकाराम मंगल व अशोक कांबळे यांच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस हवालदार मनोज खोत, शरद पोरे, संदीप पावलेकर यांनी केली.
लाचेसाठी घेतले आगावू चेक
तडजोडीअंती कांबळे याने एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली; परंतु तक्रारदार यांनी झालेल्या कामाचे बिल न मिळाल्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर कळस म्हणजे, कांबळे याने तेवढ्या रकमेचे चेक मागितले व हे चेक घेतल्यावरच त्याने मूल्यांकनावर स्वाक्षºया केल्याचे व नमूद मूल्यांकनावर पूर्वीच्या तारखा टाकल्याचे निष्पन्न झाले.