दोघा डॉक्टरांसह तिघांना अटक
By Admin | Published: June 26, 2015 01:10 AM2015-06-26T01:10:46+5:302015-06-26T01:10:46+5:30
गर्भलिंग चाचणीचा संशय : कारसह मोबाईल, सोनोग्राफी यंत्र जप्त
कोल्हापूर : जुना वाशीनाका चौकात आलिशान कारमध्ये गर्भलिंग चाचणी करणारे मोबाईल, सोनोग्राफी यंत्र घेऊन कारसह संशयितरीत्या थांबलेल्या दोघा डॉक्टरांसह चालकाला बुधवारी (दि. २४) रात्री जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.
संशयित डॉ. हिंदुराव बाळासाहेब पोवार (वय ३०, रा. शिरगाव, ता. राधानगरी), डॉ. हर्षल रवींद्र नाईक (३१, रा. रिंग रोड, बोंद्रेनगर), चालक सुशांत मारुती दळवी (२६, रा. कांचनवाडी, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी पोलिसांनी ३५ लाखांची कार व पाच लाखांचे चायना बनावटीचे यंत्र असा चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने व पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये संशयित डॉक्टरांनी आतापर्यंत २० पेक्षा जास्त गर्भलिंग चाचण्या केल्याचे तपासांत निष्पन्न झाल्याचे समजते. या कारवाईमुळे जिल्ह्यात छुप्या मार्गाने आजही गर्भलिंग चाचण्या होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, जुना वाशीनाका चौकात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काळ्या रंगाची आलिशान कार (एमएच ०९, एजी ९५९५) उभी असून त्यामध्ये गर्भलिंग चाचणी करणारे यंत्र आहे, अशी माहिती खबऱ्याकडून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाईचे आदेश दिले. पथकाने वाशीनाका येथे जाऊन रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये दोन डॉक्टर व चालक बसून होते; तर चालू स्थितीतील एक यंत्र आढळले. या यंत्राबाबत खात्री करण्यासाठी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी महापालिकेचे आरोग्याधिकारी दिलीप पाटील यांना पत्र दिले.
त्यानुसार गुरुवारी दुपारी डॉ. पाटील वैद्यकीय पथकातील सदस्य डॉ. सुनंदा नाईक, योगिता भिसे, अजित पाटील यांच्यासह पोलीस ठाण्यात आले. त्यांनी संबंधित यंत्राची पाहणी केली असता ते चायना बनावटीचे गर्भलिंग चाचणी करणारे सोनोग्राफी यंत्र असल्याचे स्पष्ट झाले. ते यंत्र चालू स्थितीत असल्याचेही दिसून आले. या यंत्राद्वारे नेमक्या किती गर्भलिंग चाचण्या केल्या आहेत, याची माहिती यंत्राच्या हार्ड डिस्कवरून स्पष्ट होणार आहे. त्यासाठी ही डिस्क तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी डॉ. योगिता भिसे यांनी फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे, ज्यांना काहीही ज्ञान नाही, असे लोक मोबाईल सोनोग्राफी यंत्राद्वारे गावोगावी फिरून गर्भलिंग चाचण्या करीत असल्याची माहिती आमच्या कानांवर येत होती; परंतु प्रत्यक्षात कृती करणारे आढळून येत नव्हते. आजच्या कारवाईमधून या रॅकेटचे नेटवर्क कोठेपर्यंत आहे, याचा उलगडा होईल.
- डॉ. दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी, महापालिका