ना विमान, ना रेल्वे, दोन दोस्तांचा 'कोल्हापूर टू लंडन' प्रवास थेट कारमधून..
By संदीप आडनाईक | Published: April 16, 2024 01:24 PM2024-04-16T13:24:27+5:302024-04-16T13:26:43+5:30
७० दिवसांच्या १७,००० किलोमीटरच्या या भ्रमंतीदरम्यान, ते २० देशांतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जगात भारी, आपले कोल्हापुरी. कोल्हापुरकर काय करतील याचा नेम नाही. दुसऱ्या देशात जाण्यासाठी लोक सहसा विमान, जहाज किंवा रेल्वेमार्ग पसंत करतात, मात्र कोल्हापुरातील दोन दोस्तांनी आपल्या फार्च्युनर कारने कोल्हापूर ते लंडनपर्यंतच्या २० देशांच्या प्रवासाला सोमवारपासून सुरुवात केली आहे, असं सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. थेट कोल्हापुरातून कारने प्रवास करणारे ते पहिलेच आहेत.
वसुधैव कुटुंबकम म्हणजे विश्व हे एक कुटुंब आहे, याचा अनुभव घेत वैयक्तिक सहल करण्याची मदन राजाराम भंडारी आणि प्रसाद उर्फ बापू कृष्णात कोंडेकर या दोन मित्रांची इच्छा होती. त्याला कोल्हापुरातील गो हॉलिडेज ३६५ चे अमित चौकले यांनी मूर्त रुप दिले. ७० दिवसांच्या १७,००० किलोमीटरच्या या भ्रमंतीदरम्यान, ते २० देशांतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहेत. साने गुरुजीतील भंडारी हे पन्नाशीचे तर राजारामपुरीतील कोंडेकर हे ५८ वर्षांचे आहेत. दोघेही उद्योजक आहेत. यापूर्वीही त्यांनी २० देशांमध्ये पर्यटन केले आहे. परंतु कोल्हापुरातून कारने थेट लंडन गाठण्याची त्यांची इच्छा होती ती या निमित्ताने ते पूर्ण करत आहेत. कोल्हापुरकरांना अभिमान वाटावा असा त्यांचा प्रवास असणार आहे.
सर्व परवानग्या अन् २० देशांचा व्हिसा
या प्रवासासाठी दाेन महिन्यांपासून ते तयारी करत आहेत. त्यात २० देशांच्या परवानग्या, गाडीच्या परवानग्या आणि व्हिसा या गोष्टींचा समावेश आहे. यानंतर या प्रवासाची तारीख त्यांनी पक्की केली. यादरम्यान त्यांच्या राहण्याची, परदेशी चलनाची, ट्रॅव्हल्स आणि मेडिकल इन्शुरन्सची व्यवस्था कोल्हापुरातील गो हॉलिडेज ३६५ चे अमित चौकले यांनी केली.
कसा असेल प्रवास?
नेपाळ, चीन, किरगिझस्तान, उझबेकिस्तान, कझाकीस्तान, रशिया, जॉर्जिया, टर्की, बल्गेरिया, सर्बिया, हंगेरी, झेक रिपब्लिकन, बेल्जियम, युके अशा २० देशांतून त्यांचा प्रवास असेल. यापूर्वी अनेकांनी कारप्रवासासाठी उत्तर प्रदेशातील गोरखपूरची निवड केली. परतीच्या प्रवासात मात्र हे दोन मित्र विमानाने कोल्हापूरला येतील.