‘राज्य नाट्य’च्या अंतिम फेरीसाठी हवीत दोन नाटके...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 08:31 PM2017-11-02T20:31:23+5:302017-11-02T20:49:40+5:30
इंदुमती गणेश,
कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येणाºया राज्य नाट्य स्पर्धेत पूर्वीप्रमाणे एका केंद्रावरून किमान दोन संघांची अंतिम फेरीसाठी निवड व्हावी, अशी मागणी हौशी नाट्यसंस्थांनी केली आहे. याशिवाय काळानुरूप स्पर्धेच्या निकषांमध्ये आवश्यक बदल केले तर कलाकारांची नवी पिढी घडविणाºया या रंगमंचीय सादरीकरणाला आणि स्पर्धेला अधिक उभारी मिळणार असून, याबाबतचा प्रस्ताव सध्या शासनाच्या विचाराधीन आहे.
कोल्हापुरातील रंगकर्मींच्या प्रयत्नाला यश येऊन येथे सहा वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. या सगळ्या संघांमधून प्रथम येणाºया एका संघाला अंतिम फेरीसाठी पाठविले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत एका केंद्रावरील आठ नाटकांतून एक नाटक याप्रमाणे सादरीकरण करणाºया संघांच्या संख्येवर अंतिम फेरीला जाणारे संघ निवडले जात असत.
संघांची संख्या जास्त असली तर एका केंद्रावरून दोन ते तीन नाटके अंतिम फेरीत सादरीकरण करायची. मात्र ही पद्धत राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने बदलली व एका प्राथमिक केंद्रावरून केवळ पहिले येणारे एकमेव नाटक अंतिम फेरीसाठी निवडण्यात येऊ लागले. कोल्हापूर केंद्रावरून दरवर्षी २२ ते २३ संघ राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतात. त्यात कोल्हापूर शहर ग्रामीणसह अन्य शहरांतील नाट्यसंस्थांचाही सहभाग असतो. यंदा चार-पाच संघांची माघार झाल्याने जवळपास १८ संघ राज्य नाट्य स्पर्धेचा पडदा गाजविणार आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येने नाटकांचे सादरीकरण होत असताना पहिल्या तीन क्रमांकांच्या नाटकांमध्ये दोन-तीन गुणांची तफावत असते; त्यामुळे अन्य संघांना अंतिम फेरीतील सादरीकरणाची संधी गमवावी लागते. एवढ्या मोठ्या संख्येने सादर होणाºया नाटकांपैकी एकाच संघाला अंतिम फेरीसाठी निवडले जात असल्याने सादरीकरणाचा कस लागत असला तरी अन्य संघांना अंतिम फेरीच्या संधीसाठी फारसा वाव राहत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच नाटकांच्या सादरीकरण केलेल्या आठ संघांमागे एक संघ अशा रीतीने अंतिम फेरीसाठी नाटकांची निवड व्हावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे.
दोनशेहून अधिक कलाकारांना व्यासपीठ
व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपटांचा पाया म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा असते. त्यातून तावून सुलाखून निघालेला कलाकार यश मिळवितो. या स्पर्धेने नाना पाटेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सदाशिव अमरापूरकर यांसारखे नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. ‘राज्य नाट्य’मध्ये भाग घेणाºया संघांद्वारे रंगमंच आणि बॅकस्टेज अशा जवळपास २०० हून अधिक कलाकारांना हा अनुभव समृद्ध करतो.
राज्य नाट्य स्पर्धेत उत्तमोत्तम सादरीकरण करून आमच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला; पण अजून आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याबाबत परीक्षकांची विचार करण्याची पद्धती कशी असते हे समजत नाही. त्यामुळे एका केंद्रावरून दोन-तीन संघांना अंतिम फेरीत सादरीकरण करता आले तर भाग घेणाºया संघांची उमेद आणि संधी वाढणार आहे.
- संजय मोहिते (फिनिक्स क्रिएशन)
राज्य नाट्य स्पर्धा ही एकमेव अशी चळवळ आहे, ज्यात ग्रामीण भागातील कलाकारांनाही वाव मिळतो. त्यांच्याकडून वर्षभर प्रबोधनाचे काम सुरू असते. आर्थिक अडचणींसह संघर्षातून मार्ग काढत संघ रंगमंचावर सादरीकरणासाठी येतात. नाटकांची संख्या कमी होत असताना या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी नावीन्याची जोड दिली गेली पाहिजे.
सुनील माने (हनुमान तरुण मंडळ)