वयाची बहात्तरी, सायकलने करतायत पुणे-गोवा सफारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 01:15 PM2023-01-05T13:15:34+5:302023-01-05T13:16:31+5:30

पुण्यातील मुकुंद कडूसकर आणि जयंत रिसबूड वयाच्या सत्तरीतही आजारांपासून दूर

Two Punekar youths in their seventies are doing a Pune-Goa safari by bicycle | वयाची बहात्तरी, सायकलने करतायत पुणे-गोवा सफारी

वयाची बहात्तरी, सायकलने करतायत पुणे-गोवा सफारी

googlenewsNext

कोल्हापूर : छंद जोपासण्याला वयाची अट नसते हेच खरे. आंतरिक ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर शरीरही साथ देते. मात्र त्यासाठी परिश्रमात सातत्य आवश्यक आहे, असाच सल्ला वयाच्या बहात्तरीतील दोन पुणेकर तरुणांनी आपल्या कृतीतून दिला आहे. मुकुंद कडूसकर आणि जयंत रिसबूड हे दोघे सध्या पुणे-गोवा सायकल सफरीवर असून, बुधवारी त्यांनी कोल्हापुरातील पर्यटनाचा आनंद घेतला.

वयाच्या साठीत पोहोचताच मनाने निवृत्त झालेले अनेकजण विरक्तीच्या गप्पा मारत बसतात. पुण्यातील मुकुंद वसंत कडूसकर आणि जयंत काशीनाथ रिसबूड याला अपवाद आहेत. वयाच्या बहात्तरीतही हे दोघे उत्साहाने सायकलिंग आणि ट्रेकिंग करतात. अबूधाबीतील एका कंपनीतून निवृत्त झालेल्या कडूसकरांना शालेय वयापासूनच सायकलिंगचे वेड आहे.

रिसबूड यांनी आजवर ९० गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग केले. गेल्या वर्षी या दोघांनी संपूर्ण कोकण सायकलीवरून पालथा घातला. १ जानेवारीला पुण्यातून निघालेले हे दोघे सायकलस्वार मंगळवारी (दि. ३) सायंकाळी कोल्हापुरात पोहोचले. बुधवारी कोल्हापुरात पर्यटनाचा आनंद घेऊन ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले.

रत्नागिरीतून सावंतवाडीमार्गे ते पुढे गोव्यात जाणार आहेत. १५ जानेवारीपर्यंत गोव्यात पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. वाटेतील शहरे आणि गावांमध्ये थांबून ते लोकांशी गप्पा मारतात. सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवून देतात. सायकलिंगचा आनंदच जगण्याची ऊर्मी वाढवत असल्याचे ते सांगतात.

दोघेही आजारांपासून दूर

कडूसकर आणि रिसबूड वयाच्या सत्तरीतही आजारांपासून दूर आहेत. मधुमेह, रक्तदाब, पाठदुखी असा कोणताच आजार त्यांना जडलेला नाही. प्रचंड उत्साह, सकारात्मक दृष्टिकोन, गरजेपुरता आहार, कुटुंबीयांशी गप्पा आणि रोज किमान ४० ते ५० किलोमीटरचे सायकलिंग यांमुळेच आपण या वयातही आजारांना दूर ठेवल्याचे दोघांनी सांगितले.

Web Title: Two Punekar youths in their seventies are doing a Pune-Goa safari by bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.