बनावट नोटा प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:57+5:302021-08-14T04:30:57+5:30

जिल्ह्यातील नोटा वितरणचाही तपास सुरू लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : बनावट नोटाप्रकरणी अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी येथील न्यायालयात हजर ...

Two remanded in police custody | बनावट नोटा प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

बनावट नोटा प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी

googlenewsNext

जिल्ह्यातील नोटा वितरणचाही तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : बनावट नोटाप्रकरणी अटक केलेल्या दोघांना शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या दोघांचे कर्नाटक कनेक्शन तपासात समोर आल्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा कर्नाटककडे वळवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या दोन वर्षात त्यांनी बनावट नोटा मोठ्या प्रमाणात वितरित केल्याचा संशय आहे.

मुख्य संशयित आंबाजी शिवाजी सुळेकर (वय ४२, रा.पासार्डे) व राजूभाई इस्माईल लवंगे (५५, रा.कळंबे तर्फ ठाणे) अशी दोघांची नावे आहेत. शहरातील एका बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये साडेचार हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. या नोटांच्या आधारे तपास करत शिवाजीनगर पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा छडा लावला. सुळेकर व लवंगे या दोघाही संशयितांना अटक करून दहा लाख ५४ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा, तसेच प्रिंटर, स्कॅनर, आदी ६५ हजारांचे साहित्य असा सुमारे अकरा लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुळेकर व लवंगे या दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या दोघांचा कोल्हापुरातच संपर्क आला. त्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी बनावट नोटा वितरण करण्याचे काम सुरू केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सुळेकर याला बेळगाव येथील एका संशयिताने ६ लाखांच्या बनावट नोटा दिल्या होत्या. या नोटांसारख्या हुबेहूब नोटा तयार करण्याचे काम सुळेकर आपल्या शॉपीमध्ये करीत होता. सुळेकर व लवंगे या दोघांच्या माध्यमातून जिल्ह्यात कोल्हापूर शहरासह अन्य ठिकाणी बनावट नोटा वितरण झाल्या आहेत का, याची माहिती घेण्यात येत आहे. या रॅकेटमध्ये कर्नाटकातील बेळगावसह अन्य काही ठिकाणच्या संशयितांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने आता पोलिसांनी विविध पथकांद्वारे तपास सुरू केला आहे. संशयितांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्सही तपासण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिस अंमलदार नंदकिशोर कराड यांनी दिली.

Web Title: Two remanded in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.