साथरोग नियंत्रण केंद्राचे दोन संशोधक कोल्हापुरात दाखल
By संदीप आडनाईक | Published: March 19, 2024 08:10 PM2024-03-19T20:10:35+5:302024-03-19T20:10:47+5:30
महापालिका, सीपीआर आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून उद्या घेणार माहिती
कोल्हापूर : मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज झालेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याच्या प्रकारानंतर केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) दोन ज्येष्ठ संशोधक अधिक अभ्यासासाठी मंगळवारी कोल्हापुरात आले आहेत. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून रेबीजने झालेल्या मृत्यूसंदर्भात ते उद्या, बुधवारी अधिक माहिती घेणार आहेत. याशिवाय संबंधित मृत तरुणीच्या नातेवाईकांचीही भेट ते घेणार आहेत.
या पथकामध्ये ईआयएस अधिकारी डाी. सौनतप्पन बालसुब्रमण्यम आणि सेंटर फॉर वन हेल्थचे साथरोग तज्ञ डॉ. हनुल ठुकराल यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम (एनआरसीपी) सुरु केला आहे. मोफत औषध उपक्रमांद्वारे रेबीज लस आणि रेबीज इम्युनोग्लोब्युलिनची तरतूद, प्राण्यांच्या चाव्याचे योग्य व्यवस्थापन, रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रण, पाळत ठेवणे आणि परस्पर समन्वय यावर प्रशिक्षण, प्राण्यांच्या चाव्याव्दारे आणि रेबीज मृत्यूच्या अहवालावर पाळत ठेवणे मजबूत करणे, रेबीज प्रतिबंधाबद्दल जागरुकता निर्माण करणे,ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने देखील संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याची आणि कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २०२३ प्रभावीपणे लागू करण्याबाबत अभ्यास करण्यात येत आहे.
कोल्हापुरातील एका तरुणीचा ४ मार्च रोजी रेबीजमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे येथील रेबीजचे प्रमाण आणि रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी हे पथक मंगळवारी पुण्याहून कोल्हापुरात दाखल झाले आहे. हे पथक उद्या बुधवारी मृत तरुणीला देण्यात आलेली औषधे, तिला योग्य लस दिली होती का, रेबीजची लागण कधी झाली याची माहिती घेणार आहे. या दौऱ्यात ते महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची माहिती घेतील.
याशिवाय सीपीआरमध्ये राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम आणि औषधांचा साठा याची माहिती घेणार आहेत.
रेबीज नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेणार
कसबा बावडा येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात आरोग्य उपसंचालक डॉ. दिलिप माने यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत ते पाच जिल्ह्यातील रेबीज नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेणार आहेत. हे पथक मृत तरुणींच्या नातेवाईकांचीही भेट घेणार आहेत.