दोघे अट्टल दुचाकी चोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:07+5:302021-03-23T04:27:07+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सीमावर्ती भागात दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून ...
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सीमावर्ती भागात दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीच्या १५ दुचाकी जप्त केल्या. सुरेश कृष्णमूर्ती शेट्टी (वय ३५, रा. व्यंकटेश पार्क, मुडशिंगी, ता. करवीर. मूळ रा. शिमोगा, कर्नाटक), मायाप्पा शिवाप्पा कोळी (वय २५, रा. पाटील मळा, करोली, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने केली.
शेट्टी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, सांगलीसह निपाणी परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी पथके तयार करून शोधकार्य सुरू केले. त्यावेळी पोलीस अंमलदार सोमराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहा. पो. नि. सत्यराज घुले व त्यांच्या पथकाने कसबा बावडा रोडवर सेंट झेवियर्स हायस्कूलनजीक सापळा रचला. तेथे विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या सुरेश शेट्टी याला पकडून अटक केली. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी मदत करणारा साथीदार मायाप्पा कोळी यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १५ दुचाकी जप्त केल्या.
कारागृहातून सुटला अन् पुन्हा चोरीचा सपाटा
कोल्हापूर, सांगलीसह निपाणी (कर्नाटक) या भागात सुमारे १९ दुचाकी चोरीप्रकरणी सुरेश शेट्टी हा कळंबा कारागृहात होता. नोव्हेंबर २०२० मध्ये तो जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा दुचाकी चोरीचा सपाटा लावला. सध्याच्या कारवाईत त्याने कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच, गोकुळ शिरगाव हद्दीतील दोन, गांधीनगर, शहापूर, शिवाजीनगर (इचलकरंजी), फलटण (सातारा) या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील प्रत्येकी एक, सांगली शहर व महात्मा गांधी चौक पोलीस (सांगली) हद्दीतून प्रत्येकी दोन अशा एकूण १५ दुचाकी चोरल्या. त्या जप्त केल्या.
दुचाकींची ग्रामीण भागात विक्री
संशयित शेट्टी हा चोरीच्या दुचाकी मिरजेचे मायाप्पा कोळी याच्याकडे विक्रीसाठी देत होता. त्या दुचाकी तो ग्रामीण भागात शेती कामासाठी शेतकऱ्यांना विक्री करत होता.
सहा महिन्यांत १३८ दुचाकी जप्त
पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे शैलेश बलकवडे यांनी घेतल्यानंतर दि. १ ऑक्टोबर २०२० पासून २२ मार्च २०२१ पर्यंत जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशननी केलेल्या कारवाईत एकूण १३८ चोरीच्या दुचाकी चोरट्याकडून जप्त केल्या. तर गेल्या तीन महिन्यांत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तब्बल ५० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.
फोटो नं. २२०३२०२१-कोल-पोलीस ॲक्शन०१
ओळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दोघा चोरट्यांकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या.
फोटो नं. २२०३२०२१-कोल-सुरेश शेट्टी (आरोपी)
फोटो नं. २२०३२०२१-कोल-मायाक्का कोळी (आरोपी)