कोल्हापुरात स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण आढळले
By admin | Published: August 14, 2015 12:39 AM2015-08-14T00:39:03+5:302015-08-14T00:39:03+5:30
एक रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात गुरुवारी सकाळी दाखल झाला आहे, तर दुसरा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे
कोल्हापूर : कोल्हापुरात गुरुवारी स्वाइनसदृश संशयित दोन रुग्ण आढळले असून, त्यांतील एक रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात गुरुवारी सकाळी दाखल झाला आहे, तर दुसरा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
राज्यात पाऊस आणि दमट वातावरणामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळू लागले आहेत. बुधवारी (दि. १२) पुण्यात दोन युवकांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे वृत्त वाहिन्यांवर सर्वत्र प्रसारित होत असतानाच कोल्हापुरातही गुरुवारी दोघाजणांना स्वाइन फ्लूसदृश आजार झाल्याचे आढळल्याने पुन्हा एकदा स्वाइन फ्लू डोके वर काढतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. संशयित रुग्णांपैकी एकजण हातकणंगले येथील असून, तो उपचारासाठी सीपीआर रुग्णालयाच्या स्वाइन फ्लू कक्षात दाखल झाला आहे; तर दुसरा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला आहे. या रुग्णाबाबत खासगी रुग्णालयाने सीपीआर प्रशासनाशी संपर्क साधला असून, हा रुग्णही आपल्याकडे उपचारासाठी पाठवीत असल्याचे कळविले आहे. सायंकाळपर्यंत दुसरा संशयित रुग्ण सीपीआरमध्ये दाखल झालेला नव्हता; त्यामुळे त्याच्याबाबत अधिक माहिती उपलब्ध झाली नाही. याबाबतच्या वृत्तास शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दुजोरा दिला आहे.