Kolhapur: कोवाड चोरीप्रकरणी दोन पथके राजस्थानला रवाना, बिश्नोई गँगशी संबंध असण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:38 IST2025-01-07T15:37:48+5:302025-01-07T15:38:11+5:30
चोरट्यांनी विमान प्रवासाची दोन तिकिटे बुक केल्याचीही माहिती

Kolhapur: कोवाड चोरीप्रकरणी दोन पथके राजस्थानला रवाना, बिश्नोई गँगशी संबंध असण्याची शक्यता
चंदगड : एटीएम फोडून १९ लाख रक्कम लंपास केलेल्या प्रकरणात वापरलेली कार ही राजस्थानची असल्यामुळे त्यानुसार तपासाची चक्रे फिरविण्यास चंदगड पोलिसांनी सुरुवात केली असून, रविवारी रात्रीच दोन पथके राजस्थानच्या दिशेने रवाना झाली आहेत.
शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोवाडमधील स्टेट बँकेचे एटीएम फोडून १९ लाख लांबविले. या प्रकरणात पोलिसांच्या व्हॅनला समोरासमोर धडक बसल्याने चोरांच्या कारचा टायर फुटला. त्यामुळे त्यांनी कार हेब्बाळमध्येच सोडून पोबारा केला होता. सदर कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यासंदर्भात अधिक तपास केला असता ती कार राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिक तपासाबरोबरच पोलिसांनी आपली मोहीम राजस्थानकडे वळवली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके त्या दिशेने रवाना झाली आहेत. तसेच घटनेचा राजस्थानमधील बिश्नोई गँगशी संबंध असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरू ठेवल्याचे समजते.
सीसीटीव्हीची गरज
कर्यात भागातील ५२ हून अधिक गावांसाठी कोवाड ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. नेहमी वर्दळ असल्याने आर्थिक उलाढालही बाजारपेठेत असते; पण सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्हीची सोय करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्यास स्थानिक व्यापाऱ्यांना अभय मिळू शकत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कारच्या कागदपत्रांवरून चोरट्यांचा सुगावा
चोरीनंतर पळून जाणाऱ्या चोरट्यांनी हेब्बाळजवळ कार सोडली. त्यावेळी चोरट्यांनी एका शेतात धाव घेतली. तिथे राखणीला असलेल्या शेतकऱ्याने हटकल्याने चोरट्याकडून कारची कागदपत्रे शेतात पडली. पोलिसांना कारच्या मालकाचे नाव आणि मोबाइल नंबर मिळाला. त्यांनी पोलिसांनी संशयितांची नावे मिळवली.
रेकी करून चोरी
कार चोरी करणाऱ्याऱ्यांवर राजस्थानात एटीएम चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यानी स्थानिकांच्या मदतीने एटीएम सेंटरची रेकी केली असावी. जास्त रोकड असल्याची खात्री करून त्यांनी चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
विमानाची दोन तिकिटे
चोरट्यांच्या कारमधून पोलिसांना एक मोबाइल मिळाला. त्यावरून केवळ चारच नंबरवर कॉल गेले आहेत. मोबाइलवरून दिल्ली ते मुंबई विमान प्रवासाची दोन तिकिटे बुक केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली.