देवस्थान चोर पकडतात, पोलीस सोडून देतात; अंबाबाई मंदिरात दोन महिला सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:41 PM2022-07-01T14:41:22+5:302022-07-01T14:41:41+5:30
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पर्समध्ये हात घालून चोरी करणाऱ्या दोन महिलांना सीसीटीव्ही नियंत्रण ...
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पर्समध्ये हात घालून चोरी करणाऱ्या दोन महिलांना सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या दक्षतेमुळे पकडण्यात यश आले. सरिता अमोल शिंदे, तेजस्विनी गोट उघाले (रा. वैराट, बार्शी सध्या अहमदनगर) अशी या दोन महिलांची नावे आहेत.
देवस्थान समितीने चोर पकडून दिले तरी काही दिवसांनी पोलीस त्यांना सोडून देत असल्याने वारंवार त्याच व्यक्तींकडून चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अंबाबाई मंदिरातील कासव चौक येथे दर्शन घेण्यासाठी हैदराबाद व पुण्यातून दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या पर्समध्ये हात घालून दोन महिला चोरी करत असलेले देवस्थान सीसीटीव्ही कक्षाचे ऑपरेटर राहुल जगताप व सहाय्क सीसीटीव्ही ऑपरेटर अभिजीत पाटील यांच्या लक्षात आले. अभिजित पाटील यांच्या दक्षतेमुळे अवघ्या पाच मिनिटांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोन महिलांना पकडण्यात यश आले. देवस्थान समितीने या दोघींना जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले.
देवस्थान समितीने काही दिवसांपूर्वी अंबाबाई मंदिरात चोरी करताना एका महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. नंतर त्याच महिलांनी जोतिबावर चोरी केल्याने लक्षात आले. त्यामुळे चोरांवर कडक कारवाई व्हावी. - शिवराज नाईकवाडे, सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती