दोन हजार कोटी रूपयांच्या नोटा जमा!
By admin | Published: November 13, 2016 01:08 AM2016-11-13T01:08:16+5:302016-11-13T01:11:43+5:30
इतक्या नोटा ठेवायच्या कोठे ?: सातारा, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा बँकांसमोर प्रश्न
सातारा/रत्नागिरी : पाचशे अन् हजारांच्या नोटा रद्द झाल्यानंतर बँकांमध्ये उसळलेली गर्दी तिसऱ्या दिवशीही कायमच होती. गेल्या तीन दिवसांत सातारा जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे एक हजार कोटीच्या रद्द नोटा जमा झाल्या आहेत. अशीच स्थिती सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. या दोन जिल्ह्यांतील बँकामध्येही एक हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत.
बँकांत असलेल्या जागांमध्ये या नोटा ठेवायच्या कशा, सांभाळायच्या कशा, असा प्रश्न बँकांसमोर उभा आहे. नोटा रिझर्व्ह बँकेकडून परत नेल्या जाणार आहेत. मात्र, देशभरात नव्या नोटांचे तसेच चलनातील इतर नोटांचे वितरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे काम वाढलेले असल्याने जुन्या नोटा परत जाण्याला अजून कालावधी लागू शकतो, अशी माहिती पुढे येत आहे. मात्र तोपर्यंत आधीच नोटांचा प्रश्न मर्यादांसमोर उभा राहिला आहे.
सातारा जिल्ह्यात सरकारी, सहकारी, खासगी अन् ग्रामीण अशा एकूण ३३ बँकांच्या ५४८ शाखा कार्यरत आहेत. पहिल्या दोन दिवसांमध्ये ‘बँक आॅफ महाराष्ट्र’च्या ६२ शाखांमध्ये ६० कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महादेव शिराळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारतीय स्टेट बँकेच्या प्रतापगंज पेठ शाखेत एका दिवसात १६ कोटींच्या नोटा जमा होण्याची विक्रमी घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण ३१३ शाखांमध्ये एका दिवसात दीडशे कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्याची माहिती प्रभारी सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातही पाचशे आणि एक हजार रुपयांच्या रद्द नोटा बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी लागलेली लोकांची रीघ तिसऱ्या दिवशीही कायम होती. तीन दिवसांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये मिळून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत.
‘एटीएम’मध्ये भरण्यासाठी १00 रुपयांच्या व काही प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटाही जिल्ह्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
कर्मचारी व्यस्त : काऊंटरची वेळ रविवारीही जास्त
या बँकेच्या एखाद्या शाखेची महिनाभराची उलाढाल जेवढी असते, तेवढी रक्कम केवळ तीन दिवसांमध्ये मोजण्यात सर्व बँक कर्मचारी व्यस्त झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. रांगेत उभारून बँकेत जमा केलेल्या नोटांची ही आकडेवारी आहे.
खातेदारांच्या सोयीसाठी तीन वाजता बंद होणारा देवघेव व्यवहार सध्या साडेपाच, सहा वाजेपर्यंत सुरू आहे. रविवारीही तो उशिरापर्यंतच सुरू ठेवला जाणार आहे.