Kolhapur: आजरा तालुक्यातील जंगलात दोन पट्टेरी वाघ; गवे, हत्तीपाठोपाठ आता वाघाची दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 18:23 IST2025-01-04T18:23:18+5:302025-01-04T18:23:35+5:30
आजरा : वेळवट्टी (ता. आजरा) येथील उंबराचे पाणी या नावाचे शेतामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. धनाजी ...

Kolhapur: आजरा तालुक्यातील जंगलात दोन पट्टेरी वाघ; गवे, हत्तीपाठोपाठ आता वाघाची दहशत
आजरा : वेळवट्टी (ता. आजरा) येथील उंबराचे पाणी या नावाचे शेतामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. धनाजी राणे यांच्या बंगल्याशेजारील काजूच्या बागेमध्ये झाडावरील फांदीवर हा वाघ पहुडला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी ७:३० च्या दरम्यानची आहे. तालुक्यातील जंगलात असणाऱ्या दोन वाघांपैकी एक वाघ मानवी वस्तीजवळ येत असल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. गवे, हत्तीपाठोपाठ आता वाघाची दहशत तालुक्यात सुरू झाली आहे.
डॉ. राणे हे आपल्या शेतातील बंगल्याशेजारील फूलझाडांना पाणी घालत होते. सोबत असणार कुत्रा जोरजोराने भुंकू लागला म्हणून त्यांनी बॅटरीचा झोत कुत्र्याच्या भुंकण्याच्या दिशेने टाकला असता काजूच्या मोठ्या झाडावर आडव्या फांदीवर हा पट्टेरी वाघ झोपल्याचे लक्षात आले. सुरुवातीला मोठ्या मांजरासारखा दिसणारा हा वाघ कुत्र्याच्या मोठ्याने भुंकण्याने व बॅटरीच्या झोतामुळे राणे यांच्या लक्षात आले. भुंकत पट्टेरी वाघाच्या दिशेने गेलेल्या कुत्र्याला त्यांनी बोलावून घेतले.
या पट्टेरी वाघाने किटवडे, सुळेरान, गवसे येथील ५ पाळीव जनावरे मारली आहेत. तर या परिसरातील वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये दोन पट्टेरी वाघ स्थानबद्ध झाले आहेत. ३१ डिसेंबरला किटवडे येथील जंगलामध्ये गस्त घालण्यासाठी गेलेले पथक वाघाच्या डरकाळीने माघारी परत फिरले होते. सध्याही पट्टेरी वाघ दिवसा व रात्रीही मोठ्याने डरकाळी देत असल्याने त्यांचा आवाज पाच ते सहा कि. मी. अंतरापर्यंत जात आहे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे.
सध्या जंगलात अन्न व पाणी मिळत नसल्याने ते नागरी वस्तीसह शेतातील वस्तीजवळ येत आहेत. तालुक्यातील जंगलात दोन पट्टेरी वाघ असल्याचे वनविभागाच्या कॅमेऱ्यातून लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलाक्षेत्रामध्ये कोणत्याही कारणासाठी जाऊ नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांनी केले आहे.