महिलेच्या पोटातून ९ किलोच्या दोन गाठी काढल्या, कोल्हापुरातील सीपीआरमध्ये झाली मोफत शस्त्रक्रिया

By समीर देशपांडे | Published: March 8, 2023 04:36 PM2023-03-08T16:36:16+5:302023-03-08T16:36:48+5:30

याआधी या गाठीच्या वजनामुळे घसटत जाणाऱ्या आनंदी आता हिंडू फिरू लागल्या

Two tumors of 9 kg were removed from woman stomach, free surgery was done at CPR in Kolhapur | महिलेच्या पोटातून ९ किलोच्या दोन गाठी काढल्या, कोल्हापुरातील सीपीआरमध्ये झाली मोफत शस्त्रक्रिया

महिलेच्या पोटातून ९ किलोच्या दोन गाठी काढल्या, कोल्हापुरातील सीपीआरमध्ये झाली मोफत शस्त्रक्रिया

googlenewsNext

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील आनंदी नावाची ही मध्यमवयीन महिला. कुटुंबातील वादविवादामुळे घर सोडायला लागले. त्यावेळी तिला तिच्या पोटाचा घेर वाढत असल्याचे लक्षात आले. मुंबईपर्यंत जावून आलेल्या आनंदीची अखेर सुटका येथील सीपीआरनेच केली आणि पोटातून सात किलोची एक आणि दोन किलोची एक अशा एकूण नऊ किलोच्या दोन गाठी काढल्या. याआधी या गाठीच्या वजनामुळे घसटत जाणाऱ्या आनंदी आता हिंडू फिरू लागल्या आहेत.

त्यांची कहाणी अशी आहे. कोविडच्या काळात घरातून बाहेर पडलेल्या आनंदी निराधार स्त्री म्हणून सीपीआरमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी सीपीआर केवळ कोरोना रूग्णांसाठी राखीव होते. अशाही स्थितीत त्यांच्या सर्व तपासण्या करून पोटातली मोठी गाठ कॅन्सरची असावी असे निदान करण्यात आले. त्यांना मुंबईच्या कामा हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी पाठवले गेले.

तिथेही हेच निदान झाले व त्यांनी पुढील उपचारासाठी असमर्थतता दर्शवली. त्यामुळे पुन्हा आनंदी यांना सीपीआरमध्ये सोडण्यात आले. एव्हाना कोरोना संपला होता. आनंदी निराधार असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून घेतल्या गेल्या. सर्व विभागाच्या निवासी डॉक्टरांनी कंबर कसली.

त्यात विविध परवानग्या..तपासण्या. फिटनेस, रक्ताची जुळणी, औषधाची जोडणी करून ऑपरेशनचा दिवस ठरला आणि यशस्वीरित्या नऊ किलोच्या दोन गाठी काढण्यात आल्या.

यांचे योगदान

मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. महेंद्र बनसोडे. डॉ.अनिता परितेकर, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. शिरीष शानभाग, डॉ.भूपेश गायकवाड व डॉ.ज्योत्स्ना देशमुख, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. हुंबाळकर, डॉ. कुरणे व डॉ. सारंग ढवळे, भूलतज्ञ डॉ. मारुती पवार, डॉ प्रदीप राऊत, डॉ.राहुल जाधव, ब्लड बँक व पथोलॉजीचे सर्व डॉक्टर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते,
शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग व वॉर्ड मधील सर्व नर्सिंग कर्मचारी यांनी सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हे शिवधनुष्य उचलले. त्यांना अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय साधने अधीक्षक डॉ गिरीश कांबळे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Two tumors of 9 kg were removed from woman stomach, free surgery was done at CPR in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.