दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक, १३ गुन्हे उघडकीस, १२ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 04:17 PM2019-01-24T16:17:24+5:302019-01-24T16:18:46+5:30
ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित रोहित शिवाजी खरळकर (वय १९, रा. चावडी जवळ, अंबप, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (२१, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी येथील १३ गुन्ह्यांची कबुली दिली.
कोल्हापूर : ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित रोहित शिवाजी खरळकर (वय १९, रा. चावडी जवळ, अंबप, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (२१, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी येथील १३ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून तीन लाख किमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार यांचे तपास पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
कॉन्स्टेबल संतोष माने यांना खबऱ्याकडून ताराबाई पार्क येथे पितळी गणपती चौकात रेकॉर्डवरील दोघे चोरटे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार शनिवार (दि. १९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास सापळा रचला असता, संशयित रोहित खरळकर व शुभम घाटगे दुचाकीसह मिळून आले.
त्यांच्याजवळील दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. जिल्ह्यातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गांधीनगर, वडगाव, शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत व सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे गुन्हे केले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथील दुकानात चोरी केली आहे. दोघेही सराईत चोरटे आहेत.