धामणी खोऱ्यातील दोन गावं ‘गावपळण’साठी वेशीबाहेर ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:28 AM2021-03-01T04:28:23+5:302021-03-01T04:28:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा तारळे : ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा व ग्रामदैवतेवरील श्रद्धेपोटी ...

Two villages in Dhamani valley are outside the gates for 'Gavpalan'. | धामणी खोऱ्यातील दोन गावं ‘गावपळण’साठी वेशीबाहेर ॥

धामणी खोऱ्यातील दोन गावं ‘गावपळण’साठी वेशीबाहेर ॥

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा तारळे : ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा व ग्रामदैवतेवरील श्रद्धेपोटी गाव पळणची प्रथा आजही कायम आहे. राधानगरी तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या धामणी खोऱ्यातील चौके व मानबेट या दोन गावांतील ग्रामस्थ कुटुंबकबिल्यासह ‘गावपळण’साठी रविवार (दि. २८)पासून पुढील पाच दिवस गावच्या वेशीपासून दूर राहणार आहेत. दर तीन वर्षांनंतर ही गावपळण होते.

पाच दिवसांनंतर ग्रामदैवत रासाईदेवीचा कौल घेऊन मगच गावात गावकरी परतणार आहेत. कदाचित कौल झाला नाही, तर मुक्काम वाढण्याचीही शक्यता आहे. गावपळणच्या काळात वरील दोन गावांत लाईट बंद असून चूल किंवा दिवाबत्तीचा उजेडही केला जात नाही. इतकेच नव्हे तर घराच्या दरवाजांना कडीकोंयडा लावत नाहीत. गावच्या वेशीच्या आत किंवा हद्दीतील असणाऱ्या शेती शिवारातही ग्रामस्थ फिरकत नाहीत. या पाच दिवसांच्या काळात गावात नीरव शांतताच पाहावयास मिळते.

कुणीही या प्रथेबद्दल ठोस माहिती देत नसली तरीही वयोवृद्ध मंडळींच्या माहितीनुसार, चार पिढ्यांपासून ही प्रथा वरील दोन गावांत सुरू आहे. या प्रथेला कोणी विरोध केला तर गावात काहीतरी अघटित घडण्याची भीतीही व्यक्त होत आहे. गावापासून दूर गेल्याने ही मंडळी मोकळ्या जागेत किंवा माळरानावर पाल किंवा झोपडी मारून समुदायाने राहतात. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गुरेढोरे यांचीही सोय एकत्रित केलेली असते. गावात असताना आपापसातील भांडण-तंटे या काळात येथे पाहावयास मिळत नाहीत. याउलट ही गावपळण म्हणजे एक प्रकारचा उत्सव समजून नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असणारी या दोन्ही गावांतील मंडळी या निमित्ताने वेळ काढून कुटुंबासह या गावपळणमध्ये सहभागी होतात.

एकंदरीत गावपळणच्या निमित्तानं गावच्या वेशीपासून दूर राहणाऱ्या दोन गावांतील नागरिकांसह या काळातील त्यांच्या जीवनशैलीचे अप्रूप तालुक्यासह जिल्ह्याला वाटत आहे.

कोट --

गावपळणची प्रथा माझ्या आजा-पंजा-वडिलापासून सुरू आहे. हल्लीची तरुण पिढी याबद्दल नाक मुरडते. जे चांगलं आहे ते पाळायला काय हरकत आहे आणि त्यापासून काय त्रास नाही.

चंद्राप्पा विठ्ठल पाटील

(पंचाहत्तर वर्षीय, चौके ग्रामस्थ )

-

फोटो कॅप्शन-- गावपळणच्या निमित्ताने गावाबाहेर ग्रामस्थांनी उभा केलेले मांडव व झोपड्या.

२,३,संपूर्ण गावच स्थलांतरित झाल्याने गावात अशाच शुकशुकाट दिसत आहे.

( छायाचित्र/ रमेश साबळे )

Web Title: Two villages in Dhamani valley are outside the gates for 'Gavpalan'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.