शिवाजी पुलावरून दुचाकी सुरू

By admin | Published: August 10, 2016 12:39 AM2016-08-10T00:39:05+5:302016-08-10T01:11:09+5:30

चंद्रदीप नरके यांचे आंदोलन : प्रशासनाची कानउघाडणी; पुलाची आज पुन्हा पाहणी

A two-wheeler from Shivaji bridge | शिवाजी पुलावरून दुचाकी सुरू

शिवाजी पुलावरून दुचाकी सुरू

Next

कोल्हापूर : पुराचे पाणी काही प्रमाणात उतरल्यानंतर मंगळवारी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवाजी पुलावर आंदोलन केल्यानंतर हा पूल किमान दुचाकी वाहनांसाठी सुरू करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे लेखी पत्र मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ही परवानगी दिली. पुराचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे हा पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील सर्व वाहतूक दुसऱ्या मार्गे महामार्गाकडे वळविली होती; पण हा पूल बंद केल्यामुळे शहरालगतच्या अनेक गावांतील ग्रामस्थांची मोठी कुचंबणा झाली होती.
मंगळवारी शिवाजी पुलाजवळ धोक्याच्या पातळीवरील पाणी कमी झाल्याने हा पूल सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली. दुपारी दीड वाजता आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, आदी कार्यकर्त्यांसह पंचगंगा पुलाच्या पश्चिमेच्या बाजूस आले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांना बोलावून घेतले. मच्छिंद्रीपेक्षाही खाली पाणी गेल्याचे निदर्शनास आणून देऊन वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. गुळवणी यांनी अभियंता आर. के. बामणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून फक्त दुचाकी वाहतुकीस परवानगी दिली. नरके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी दुचाकीने शिवाजी पुलावरून शहरात प्रवेश केला.
वाहतुकीस लेखी मंजुरी नसल्याने पोलिसांनी पुन्हा दुपारी पुलावरील वाहतूक रोखली. संतप्त झालेले नरके पुन्हा पुलावर आले. त्यांनी करवीर तहसीलदार योगेश खरमाटे, करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्याशी हुज्जत घातली. नरके यांनी पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता व्ही. जी. गुळवणी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर फक्त दुचाकीसाठी वाहतुकीस परवानगी दिली.


अधिकारी शिरोळ दौऱ्यावर
पूरपरिस्थिती गंभीर बनल्याने शिवाजी पुलावरून वाहतूक बंद होती. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनातील काही अधिकारी कोल्हापूर शहरात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही मंगळवारी दिवसभर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी शिरोळला कन्यागत महापर्वाकडे गेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरके यांनी प्रशासनास धारेवर धरले.

रॅलीने
जल्लोषी प्रवेश
शिवाजी पुलाच्या पश्चिमेकडून आमदार चंद्रदीप नरके यांनी दुचाकी रॅलीने कोल्हापूर शहरात जल्लोष करीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरदार मिसाळ, कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील, इंद्रजित पाटील, रमेश कुंभार, जयवंत कुंभार, अमित पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: A two-wheeler from Shivaji bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.