उसाच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:51+5:302020-12-24T04:23:51+5:30
गडहिंग्लज : आजरा-गडहिंग्लज मार्गावरील ऐनापूर फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस जोरात धडकल्याने दुचाकीस्वार ...
गडहिंग्लज : आजरा-गडहिंग्लज मार्गावरील ऐनापूर फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस जोरात धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बापू मारुती सुतार (वय ५८, मूळ गाव येणेचवंडी, सध्या रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. बुधवारी (दि. २३) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बापू सुतार हे सुतारकी व गवंडीकाम करीत होते. हिरलगे येथील काम आटोपून दुचाकीवरून ते घरी परतत होते. दरम्यान, ऐनापूर फाट्यानजीक थांबलेल्या उसाच्या ट्रॉलीला त्यांनी धडक दिली. त्यामुळे डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रात्री उशिरा गडहिंग्लज पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.
--------
महिन्यात चौथा बळी..!
ट्रॅक्टरच्या अपघातात महिभरात चौघांचा बळी गेला. हरळी, कडगाव व नूलनंतर ऐनापूर फाट्याजवळचा हा अपघात झाला. सर्व अपघात रात्रीच झाले आहेत. हेल्मेट परिधान न केल्यामुळेच गंभीर दुखापत होऊन त्यांना प्राणास मुकावे लागले.
-------
अन् मुलं निराधार झाली..!
अपघातातील मृत बापू यांच्या पत्नीचे १० वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना एक विवाहित मुलगी व दोन अविवाहित मुले आहेत. आईनंतर वडिलांचेही छत्र हरपल्यामुळे मुले निराधार झाली.