दोन चाकावरचा गाडा रुतला समस्यांच्या गाळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2015 12:37 AM2015-05-19T00:37:03+5:302015-05-19T00:48:34+5:30
व्यवसाय संकटात : मालवाहतूक गाड्यांच्या जमान्यात हातगाडीवाल्यांचे तुरळकच अस्तित्व
प्रदीप शिंदे - कोल्हापूर -उन्हाळ्यात कडक उन्हाचे चटके सोसत, पावसाळ्यात ओल्याचिंब अंगाने पोटची खळगी भरण्यासाठी जिवाचा आकांत करत हातगाडी ओढण्यातच त्यांचे निम्मे आयुष्य संपलेले. अशातच भरगर्दीमध्ये प्रत्येकजण त्यांना ‘ए मामा, जरा बाजूला घे तुझा गाडा’ असा आदेश देत सायकलस्वारापासून चारचाकीवाले त्यांच्याकडे वैतागलेल्या नजरेने बघत बाजूने जात असतात. मात्र, त्यांचे दु:ख आणि वेदना कधी, कोणालाही दिसत नाही.
आधुनिक स्पर्धेच्या युगात मानवी जीवन धावपळीचे बनले आहे. सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाले आहेत. यांत्रिकीकरणामुळे काबाड कष्ट आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांवर मोठा परिणाम झाला आहे. एकेकाळी ज्यांच्याशिवाय पर्याय नसायचा, अशा हातगाडीवाल्यांनाही स्वत:च्या अस्तित्वासाठी आता झुंजावे लागत आहे. संगणकीय युगातही कष्टकऱ्यांना जगण्याचा आधार देणाऱ्या हातगाडीवाल्यांचे तुरळक अस्तित्व टिकून असले तरी आधुनिक वाहनांमुळे त्यांचा व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. सध्या कोल्हापुरात साधारणपणे ५० ते ६० हातगाड्यांवर कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्यांत ३५ वर्षांच्या तरुणांपासून ६५ वर्षीय दत्तू साळवी यांच्यापर्यंत हातगाडीवाल्यांचा समावेश आहे. कुणाला आपल्या एकवेळच्या जेवणाची, निवाऱ्याची तर कोणाला आपल्या मुलींच्या लग्नाची चिंता सतावत आहे. यासारख्या अनेक समस्यांचा डोंगरांच्या खाचखळग्यांतून हे आपला दोन चाकांचा संसार चालवत आहेत.
लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, टिंबर मार्केट, महानगरपालिका या परिसरात हे हातगाडीवाले दिसतात. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने हा व्यवसाय आता शेवटची घटका मोजत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये मिळत होते. आता दिवसाकाठी ६० ते १०० रुपये मिळणे कठीण होऊन बसले आहे.
हातगाडी बनविण्यासाठी साधारणपणे सात ते दहा हजार रुपये खर्च येतो. या व्यवसायात ग्रामीण भागातील लोकांचा मोठा सहभाग आहे. गावाकडे तुटपुंजी शेती व अन्य उत्पन्नाची साधने नसल्याने सामान्य कुटुंबातील माणसे हा व्यवसाय करतात. बहुसंख्य निरक्षर असलेली ही माणसे व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत; पण त्यांना पुरेसा मोबदला मिळत नाही. आधुनिकेतेची कास धरून जुनी किंवा नवीन एखादी गाडी घ्यायची म्हटले की, पुरेसा पैसा नाही की कोणतीही शासकीय योजना नाही. त्यामुळे हा घटक दुर्लक्षित पडला आहे.
हातगाडी ओढणारे हे सर्व व्यक्ती माथाडी कामगारांमध्येच मोडतात. मात्र, हे सर्व व्यक्ती विखुरल्याने आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना शासकीय योजनेचे लाभ मिळत नाहीत तसेच शासनातर्फे त्यांना मदत करण्याबाबत उदासीनता दिसून येते. या सर्वांना एकत्र करून त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांचे दु:ख समजून गरजेचे आहे.
- रघु कांबळे, उपाध्यक्ष, कोल्हापूर फेरीवाले युनियन