दोघा साक्षीदारांनी चांदणेला ओळखले
By Admin | Published: August 4, 2016 01:07 AM2016-08-04T01:07:22+5:302016-08-04T01:21:55+5:30
उपस्थित शहारले : आज आणखी साक्षीदारांच्या साक्षी होणार
कोल्हापूर : देवकर पाणंद परिसरातील शाळकरी मुलगा दर्शन शहा खून खटल्याच्या सुनावणीला मंगळवार (दि. २) पासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुरुवात झाली. बुधवारी न्यायालयात सरकार पक्षातर्फे दर्शनचा मित्र आदित्य आनंदा डावरे आणि शेजारी राहणाऱ्या सुनंदा सदाशिव कुलकर्णी या दोघांच्या साक्षी झाल्या. त्यांनी संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २४, रा. सुश्रूषा कॉलनी) याला ओळखले. यावेळी धमकीच्या पत्राचा लिफाफाही त्यांनी ओळखला. आज, गुरुवारी अन्य साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या जाणार आहेत.
पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २५ डिसेंबर २०१२ रोजी देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा (१०) या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (२४, रा. सुश्रूषा कॉलनी) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक यशवंत केडगे यांनी परिस्थितिजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी ३० साक्षीदारांचे जबाब घेऊन तपास पूर्ण करून एप्रिल २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले.
या खटल्याच्या सुनावणीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. सुनावणीच्या पहिल्या दिवशी न्यायालयात साक्ष देताना दर्शनचे कपडे पाहून आई स्मिता शहा यांना अश्रू अनावर झाले होते.
या प्रसंगाने न्यायालयातील वातावरण काही काळ भावनिक झाले. बुधवारी सरकार पक्षातर्फे दर्शनचा मित्र आदित्य डावरे आणि सुनंदा कुलकर्णी या दोघांच्या साक्षी झाल्या. खटल्याच्या सुनावणीमध्ये साक्षीदार सांगत असलेल्या माहितीने अनेकांच्या अंगार शहारे येत होते.
यावेळी तपास अधिकारी यशवंत केडगे, दर्शनचे नातेवाईक, साक्षीदार, सुश्रूषानगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)
आदित्य डावरेची साक्ष
गायब होण्यापूर्वी २५ डिसेंबर २०१२ च्या रात्री दर्शन हा चांदणे हा आदित्य डावरे याच्यासोबत होता. ‘दर्शन आपल्यासोबत होता, हे कोणालाही सांगू नको; नाहीतर तुला ठार मारणार,’ अशी धमकी चांदणे याने दिल्याचे आदित्यने न्यायालयात सांगितले. रात्री सव्वानऊच्या सुमारास चांदणे याने धमकीचा लिफाफा दर्शनच्या दारात टाकण्यासाठी दिला होता. मात्र तो मी स्वीकारला नाही. आपण घाबरून आजारी पडलो. तीन दिवस रुग्णालयात दाखल होतो. उपचारानंतर घरी आल्यानंतर चांदणे याने दिलेल्या धमकीची माहिती आई-वडिलांना सांगितली.
सुनंदा कुलकर्णी यांची साक्ष
सुश्रूषानगर येथे राहणाऱ्या सुनंदा सदाशिव कुलकर्णी यांची साक्ष झाली. त्यांनी दर्शनच्या घरासमोरील नारळाच्या झाडाखाली सापडलेला धमकीचा लिफाफा बकरे नावाच्या व्यक्तीकडे दिल्याचे सांगितले. तो मजकूर ओळखून त्यांनी त्यातील मजकुराची माहिती न्यायालयात दिली. उलटतपासणीत आरोपीचे वकील अॅड. पीटर बारदेस्कर यांनी सुनंदा कुलकर्णी यांची साक्ष खोटी असल्याचा आरोप केला. दर्शनची आई स्मिता शहा यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे त्यांना मदत करण्यासाठी कुलकर्णी खोटी साक्ष देत असल्याचा त्यांनी आरोप केला. आदित्य डावरे हादेखील खोटी साक्ष देत आहे. मात्र, हे आरोप दोन्ही साक्षीदारांनी फेटाळले.
आदित्यला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न
दर्शन कॉलनीतील एका घरात २५ डिसेंबर २०१२
रोजी आंबिलप्रसाद घेण्यासाठी गेला होता, असे आदित्यने सांगितले आहे. मात्र उलटतपासात अॅड. बारदेस्कर यांनी त्याला शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला. दर्शनच्या हातात किटली किंवा भांडे नव्हते तर
तो प्रसाद घेऊन कसा आला? असा प्रश्न बारदेस्कर
यांनी केला. त्यावर दर्शन तिथेच आंबिल घेऊन
आल्याचे आदित्यने सांगितले. ‘घेऊन’ की ‘पिऊन’
या शब्दांवर आदित्य गोंधळला. त्यामुळे अखेर न्यायालयाने हस्तक्षेप करीत ‘तो तिथंच पिऊन
आल्या’चे साक्षीदार सुचवीत असल्याचे सांगितले.