धोपेश्वरजवळ गाडी उलटून दोन महिला ठार
By Admin | Published: February 26, 2017 01:04 AM2017-02-26T01:04:38+5:302017-02-26T01:04:38+5:30
दहा जखमी : ब्रेक निकामी झाल्याने घटना; तीन वाहनांना ठोकरले
मलकापूर : धोपेश्वरच्या यात्रेत देवदर्शन करून घाट उतरताना क्रुझर गाडीचा ब्रेक निकामी झाल्याने वाटेतील तीन वाहने व सहा पादचाऱ्यांना उडवित ती चाळीस मीटरवर उलटून झालेल्या विचित्र अपघातात दोन महिला ठार, तर दहा भाविक जखमी झाले. सुलाबाई महादेव पाटील (रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) व आक्काताई दगडू कांबळे (वय ६०, रा. ओकोली) अशी ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. दुपारी दीड वाजता हा अपघात धोपेश्वर मार्गावरील जावली हद्दीच्या फरशीच्या ओघळावरील वळणावर झाला.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कासार्डे (ता. शाहूवाडी) गावातील ग्रामदैवत धोपेश्वर देवाची यात्रा भरली होती. कासार्डे गावापासून जंगलात तीन किलोमीटर अंतरावर धोपेश्वर मंदिर आहे. येथे तीन दिवस यात्रा सुरू असते. शनिवारी कर्नाटक राज्यातून यात्रेसाठी चालक धोंडू बाबू येडगे हे आपल्या क्रुझर गाडीतून (केएस २६ ५४११) यात्रेसाठी आले होते. देवदर्शन करून धोपेश्वर मंदिरापासून गाडी रस्त्यातून जात असताना अचानक गाडीचा ब्रेक निकामी झाला. यात्रेसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याकडेला चारचाकी व टू व्हीलर गाड्या थांबल्या होत्या. गाडीचा ब्रेक निकाणी झाल्याने चालक आरडाओरड करून भाविकांना बाजूला व्हा, असे सांगत होता. मात्र, रस्त्याकडेला असलेल्या स्कार्पिओ (एमएच २४ व्ही ४११) व इंडिका (एमएच ०४ बीएन ३६३२) या दोन गाड्यांना जोराची धडक देऊन क्रुझर गाडी रस्त्यात उलटली. क्रुझर व इंडिका गाडीतील भाविक जखमी झाले.
गाडी उलटी होताच यामधील महिला व पुरुष जखमी झाले. यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी खासगी गाडीतून जखमींना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यामध्ये सुलाबाई महादेव पाटील (रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) ही भाविक महिला जागीच ठार झाली, तर आक्काताई दगडू कांबळे (वय ६०, रा. ओकोली) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सी.पी.आर. कोल्हापूर येथे नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये सचिन बाळू पाटील (रा. कडवे), संदीप मारुती देसाई (रा. शिराळा), धोंडू बाबू येडगे (रा. कर्नाटक), प्रदीप दगडू पाटील (रा. पेरीड), विठू बाबू कुंभार (रा. कर्नाटक), बिरू नवलू येडगे (कर्नाटक), सुभाष बाळू इंगवले (रा. कोतोलीपैकी इंगवलेवाडी), आदित्य सतीश पाटील (रा. मलकापूर), शंकर पाटील (मोळावडे), भिकू नायकू पाटील हे दहा भाविक जखमी झाले. जखमींवर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. मलकापूर ग्रामीण रुग्णालयासमोर जखमी व मृत नातेवाइकांनी गर्दी केली होती. जखमींना आणण्यासाठी जि. प. सदस्य सर्जेराव पाटील, पं. स. सदस्य विजय खोत, पोलिसपाटील बापू जाधव यांनी तातडीची मदत केली.
यात्रेसाठी शाहूवाडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंदिरापासून पाचशे मीटर अंतरावर बॅरिकेट लावून गाड्या सोडल्या जात नव्हत्या. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, पोलिस निरीक्षक अनिल गाडे, तहसीलदार चंद्रशेखर सानप, जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली. शिरगाव व ओकोली गावावर शोककळा पसरली होती.
-----------------
या अपघातानंतर प्रशासनाला जाग येणार का?
गेल्यावर्षी या वळणावर मलकापूरच्या राजा वारंगे यांच्या ट्रकचा ब्रेक निकामी झाला होता, पण चालकाने ट्रक गटारात घातल्याने अपघात टळला. आठ वर्षांपूर्वी देवळासमोर लावलेली जीप उतारावरून दरीत कोसळली. गाडीतील प्रवाशांनी उड्या मारल्याने चौघे बचावले होते. अशा अपघातग्रस्त या घाटाला संरक्षक कठडे, बाजूपट्ट्या, गटार बांधणी नाही. घनदाट झाडीतून उताराने येणारी वाहने अचानक समोर येतात. गेली कित्येक वर्षे या रस्त्यावरून बॉक्साईट वाहतूक होते, पण रॉयल्टीमधून रस्ता सुरक्षित करण्याचे प्रशासनाला सुचलेले नाही. या अपघातानंतर तरी शासन, कोल्हापूर देवस्थान समिती व उत्सव समिती जागी होणार का, हा प्रश्न भाविक विचारत आहेत.
------------------
दैव बलवत्तर म्हणून वाचलो
अमोल कोळी (रा. भादोले) आपल्या नातेवाइकांना घेऊन धोपेश्वर देवदर्शनासाठी आले होते. क्रुझर गाडीने धडक दिल्याने गाडी आंब्याच्या झाडाला धडकून थांबली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
————————
इंडाल्को कंपनीविषयी भाविकांत असंतोष
कासार्डे- एैनवाडी रस्त्यावरून इंडाल्को कंपनी गेली दहा वर्षे बॉक्साईट वाहतूक करीत आहे. मात्र, या कंपनीने रस्त्यावर खड्डे पडले असताना देखील डागडुजी केलेली नाही. त्यामुळे भाविकांत असंतोष खदखदत होता.
आईचा मृतदेह पाहून टाहो फोडला
सुलाबाई पाटील या मुलगीसोबत शिरगावातून सकाळी यात्रेस आल्या होत्या. पालखी दर्शन घेऊन त्या परतल्या होत्या. त्यांच्यासोबत मुलगी सुरेखा शेळके (डोणोली) होत्या. त्या प्रसाद घेण्यास गेल्याने मागे राहिल्या. सुलाबाई पुढे झाल्या. प्रसादामुळे मुलगी बचावली. रक्ताच्या थारोळ्यात आईचा पडलेला मृतदेह पाहून सुरेखाने टाहो फोडला. रात्री उशिरा पाटील यांच्यावर शिरगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.